मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झालेला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे राष्ट्रपिता आहेत, तर महात्मा गांधी हे तेव्हाच्या काळातील राष्ट्रपिता होते, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
अमृता फडणवीस ह्या नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान, अभिरूप न्यायालयात सहभागी झाल्या होत्या. तिथे नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. माझा आरोप असा आहे की, जर नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता असतील तर महात्मा गांधी कोण आहेत? असा प्रश्न मुलाखतकारांनी विचारला. त्याला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. असं माझं ठाम मत आहे. आपले दोन राष्ट्रपिता आहेत, नरेंद्र मोदी हे आताच्या नवीन भारताचे तर महात्मा गांधी हे तेव्हाच्या काळातील राष्ट्रपित आहेत, असे विधान अमृता फडणवीस यांनी केले.
दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या रोखठोक विधानांमुळे अनेकदा वाद होत असतो. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांचा बचाव केला होता. राज्यपाल मनाने मराठी माणूस आहेत आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठी भाषा शिकून घेतली, असे त्या म्हणाल्या होत्या.