नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २८) राष्ट्राला संबोधून केलेल्या ‘मन की बात’च्या ८३ व्या भागात नाशिकचा युवक मयूर पाटील याने त्याच्या सहकाऱ्यांसह प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. खुद्द पंतप्रधानांनी मयूरच्या कार्याची दखल घेतल्याने ‘लोकमत’ने त्याच्याशी संवाद साधला असता त्याने आपल्या कल्पनेची माहिती दिली. कॉलेजमध्ये असताना तो दुचाकी वापरत होता. तिची सरासरी (मायलेज) अत्यंत कमी होते आणि उत्सर्जन खूप जास्त होते. ती दोन स्ट्रोक मोटारसायकल होती. उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि मायलेज वाढविण्यासाठी, मयूरने प्रयत्न सुरू केले. २०११-१२ मध्ये त्याने सुमारे ६२ किलोमीटर प्रति लीटरने मायलेज वाढवले. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास बळावला व काहीतरी नवीन निर्माण करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले.
नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील नवरचना शाळेतून मयूरने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मालेगाव येथील केबीएच पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या पदवीचे शिक्षण त्याने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून पूर्ण केले आहे. मयूर पुढे म्हणाला, आम्ही स्टार्ट-अप इंडिया अंतर्गत नोंदणीकृत आहोत. आम्हाला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि सांगण्यात आले की पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे, त्यांना तुमच्या उद्योगाबद्दल जाणून घ्यायचे आहे. मी कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे सेकंड हँड मोटारसायकल होती, तिचे मायलेज खूप कमी होते आणि प्रदूषणाची पातळी जास्त होती. मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी या नात्याने मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे ठरविले. मी दुचाकीचे इंजीन उघडले आणि त्यावर काम केले, नंतर मला कळले की दुचाकीचे मायलेज २०-२५ किलोमीटरवरून ४० किलोमीटर झाले आहे. त्यामुळे आणखी मायलेज कसे वाढवता येईल यावर त्याने संशोधन सुरू केले. मयूरच्या मते पूर्वी कार्बोरेटेड वाहने होती, आता फ्युएल इंजेक्टेड वाहने आहेत. कोणत्याही ज्वलनासाठी हवा, इंधन आणि स्पार्क या तीन गोष्टींची आवश्यकता असते. हे ओळखून त्याने हवेतील घटकांवर संशोधन सुरू केले जे ऑप्टिमाइझ किंवा ऑटोमाइज केले जाऊ शकतात. जवळपास सात वर्षांनंतर कल्पना अमलात आणण्यात तो यशस्वी झाला. २०१८ मध्ये त्याने प्रादेशिक परिवहन महामंडळात पायलट प्रोजेक्ट केला. उत्पादन प्रकल्पासाठी गुंतवणूकदार शोधत आहेत. सध्या मोटारसायकल, ट्रक आणि बसचे फिल्टर तयार करण्यास तो सक्षम आहे. सर्व प्रकारच्या मॉडेल्सची पूर्तता करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असे मयूर म्हणाला.
उत्तम कल्पना निर्माण करण्यासाठी फक्त एक छोटीशी ठिणगी लागते. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही असे कोणी म्हणत असेल, तर ती प्रेरणा असू शकते. कुटुंबाच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवाय एखादी गोष्ट साध्य करता येत नाही. चांगली नोकरी मिळवण्याचा पारंपरिक मार्ग सोडून वेगळा मार्ग शोधावा. -मयूर पाटील