मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज औरंगाबादमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या भव्य हॉलचे उद्घाटन होणार आहे. मात्र ज्या औरीक प्रकल्पाचे उद्घाटन मोदी हे करणार आहेत, त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला न मिळाल्याने शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी मोदींच्या दौऱ्यापूर्वी सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहेत.
दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीकसाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत, त्यांना विहीर, फळबाग, मोठी फळ झाडे, स्थावर मालमत्ता, पाइपलाइन यांचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र यातील बऱ्याच शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले असल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे कालपासून त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठवले होते. मात्र आज सकाळी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
औरीक सिटी हा केंद्र सरकारचा एक महत्वकांक्षी उपक्रम आहे. औरंगाबाद परिसरातील शेंद्रा आणि बिडकीन परिसरातील तब्बल दहा हजार हेकटर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र आजही अनेक शेतकरी मोबदला मिळवण्यासाठी डीएमआयसीच्या कार्यलयात खेट्या मारताना दिसतात. त्यामुळे या विरोधात अनेकदा शेतकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केले आहे.