मुंबई : पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने अमृत २ अभियानांतर्गत कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव व भद्रावती या शहरातील पाणीपुरवठा योजना, सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सोलापूर येथून ऑनलाईन करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांची एकत्रित किंमत १२०१ कोटी रुपये आहे. हे प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण होतील. पीएम स्व-निधी योजनेच्या लाभार्थ्यांना मदतीचे वाटपही ते करतील. या अभियानात राज्यातील १४५ शहरांचे २८,३१५ कोटी रुपये किंमतीचे ३१२ प्रकल्प केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. या अभियानातून ४१.४७ लाख इमारतींना नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. ३८.६९ लाख इमारतींना मलनिःसारणाची सुविधा दिली जाईल. या अभियानातून शहरातील सरोवर पुनरुज्जीवन आणि उद्यान विकासाचे प्रकल्प राबविले जातील.