नागपूर : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ‘परा’चा कावळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.देशातील राजकारणात भूकंप घडविणा-या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी दोषमुक्त केले आहे. यावर चव्हाण म्हणाले, मे 2014ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर झाली. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धिमाध्यमांना हाताशी धरून २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला. घोटाळा झालेला नसतानाही तसे असल्याचे दाखवून वातावरण निर्मिती करण्यात आली. त्या काळात अण्णा हजारे यांचे आंदोलन उभे राहिले. डॉ. मनमोहन सिंग यांचे जनतेने ऐकले नाही. त्याची किंमत काँग्रेसला निवडणुकीत मोजावी लागली. काँग्रेस सत्तेपासून दूर गेली आणि भाजपाला फायदा झाला. या प्रकरणाच्या सुनावणीत सत्तापक्ष पुरावे देण्यास अपयशी ठरला. भ्रष्टाचाराचे आरोप हे पुराव्याआधारे सिद्ध होतात, ही बाब भाजपा विसरली. केवळ आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न भाजपाने केला. जनतेने काँग्रेसला फासावर लटकविले. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे चव्हाण यांनी स्पष्टकेले.चव्हाण म्हणाले, विशेष सीबीआय न्यायालयात पुरावे सादर करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. पण पुरावे नसल्यामुळे सरकारला दाखल करता आले नाहीत. आरोप करणे म्हणजे पुरावे समजायचे काय? न्यायालयात खटल्याचा निकाल देण्यासाठी पुरावे लागतात. २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची सुनावणी तब्बल सात वर्षे चालली. मीडिया ट्रायलची शिक्षा मोठ्या पक्षाला बसली.मीडिया ट्रायल-कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी पुढे यावे, असे आवाहन न्यायाधीशांनी केले होते़ तरीही कोणी पुढे आले नाही़ अखेर न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपींना निर्दोष सोडले़ मीडिया ट्रायलची शिक्षा पक्षाला बसली़
‘2जी’वरून ‘परा’चा कावळा केला, पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 03:28 IST