लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पावर आता थेट पंतप्रधानांचा वॉच असणार आहे. या प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या ‘प्रगती पोर्टल’मध्ये समावेश करण्यात आला आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वे प्रगतीचा आढावा आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वॉर रूम’मधून घेतला जात होता. आता हा प्रकल्प पंतप्रधानांच्या ‘प्रगती पोर्टल’मध्येही समाविष्ट करण्यात आल्याने प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीवर पंतप्रधान कार्यालयाची नजर असणार आहे. या पोर्टलवर देशातील १० प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. २८ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान या कामाचा आढावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव गुरुवारी दुपारी नागपूर, अमरावती व औरंगाबादचे विभागीय महसूल आयुक्त आणि वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली व वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या कामाची माहिती घेणार आहेत.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धस्तरावर भूसंपादन पूर्ण केले जात आहे. एकाच गावातील तब्बल ११० कोटींच्या भूसंपादन अवॉर्ड वितरणासाठी रेल्वेमंत्री आल्यास या कामाला आणखी गती मिळू शकते, अशी माहिती यवतमाळचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), रस्ते प्रकल्प तथा संनियंत्रण अधिकारी विजय भाकरे यांनी सांगितले.वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी भगीरथ प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नातून केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २००९ रोजी या मार्गाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. राज्यसभेतील कार्यकाळात विजय दर्डा यांनी सातत्याने पाठपुरावा करून केंद्राकडून या मार्गासाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न केले. आता खुद्द पंतप्रधानांनी या मार्गाला आपल्या ‘प्रगती पोर्टल’मध्ये समाविष्ट केल्याने हा मार्ग निर्धारित कालावधीत पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा वाढली आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पावर आता पंतप्रधान ठेवणार ‘वॉच’
By admin | Published: June 22, 2017 5:11 AM