मुंबई - भाजप सरकार सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यास असमर्थ आणि अपयशी ठरलेले आहे. आज दिवसाला ५५० तरुण बेरोजगार होत आहेत आणि भविष्यात परिस्थिती अजून कठीण होत जाणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने अर्थव्यवस्था बरबाद केली. भविष्यात नजीकच्या काळात ६५ टक्के बेरोजगारी वाढणार आहे आणि हे भाजपा सरकार या बाबत काहीच ठोस पाऊल उचलत नाही आहे. हे सरकार फक्त जुमलेबाजी मध्ये व्यस्त आहे. हि जुमलेबाजी बंद करा. मंत्रालयात बसलेले लोक फक्त खोटे बोलत आहेत, म्हणून आम्ही आज बेरोजगार तरूणांना घेऊन मंत्रालयावर “प्रधानमंत्री नोकरी दो” आंदोलन केले, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
संजय निरुपम पुढे म्हणाले की आम्ही शांतपणे आंदोलन करणार होतो पण आम्हाला पोलिसांनी प्रचंड प्रमाणात फौज फाटा लावून अडवले. मंत्रालयावर जाऊ दिले नाही. या सरकारच्या काळात विरोधकांना आंदोलन हि करू दिले जात नाही आहे. हि दडपशाही आहे आणि मी याचा निषेध करतो. आज आम्हाला मंत्रालयात जाऊ दिले जात नाही आहे, भविष्यात जनताच त्यांना मंत्रालयातून बाहेर काढतील. भाजपच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातून एक हि नवीन रोजगार उपलब्ध झाला नाही. एक हि गुंतवणूक झालेली नाही. हा कार्यक्रम संपूर्णतः फेल झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना नोकऱ्या देण्याऐवजी पकोडे विकायला सांगतात. पकोडे विकणे हे वाईट नाही आहे परंतु या देशात उच्च शिक्षित लाखो तरुण आहेत त्यांनी काय पकोडेच विकायचे ? हा त्यांचा आणि त्यांच्या शिक्षणाचा अपमान आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
“प्रधानमंत्री नोकरी दो” आंदोलन करताना संजय निरुपम व बेरोजगार तरूणांना आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनामध्ये शेकडो बेरोजगार तरुण, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर यांच्यासह काही नगरसेवक सहभागी झाले होते.