ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १९ : सीमे पलिकडून अतिरेकी येऊन लष्करी छावण्यांवर प्राणघातक हल्ले करीत असताना देशाला अर्धवेळ संरक्षणमंत्री परवडणारा नाही असा टोला कॉंग्रेसने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना हाणला आहे. गोव्यातील राजकारणात अधिक रस घेऊन पर्रीकर यांचे वारंवार गोव्यात येण्याच्या प्राकाराची गंभीर दखल घेतली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांना कॉंग्रेस पक्षातर्फे पत्र लिहिले जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी दिली.
देशाच्या सीमेवर आकांडतांडव माजले असता संरक्षणमंत्री गोव्यात राजकारण करीत आहेत हे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे ते देशासाठी घातक तर आहेच, परंतु गोव्याच्या दृष्टीने लज्जास्पदही आहे असे कवठणकर यांनी सांगितले. आपल्या परवानगी शिवाय किटकही प्रवेश करू शकत नाही अशा बढाया मारत असतानाच पठाणकोट हल्ला आणि उरी येथील हल्ला झाला. हे अतिरेकी काय संरक्षण मंत्र्यांची परवानगी घेऊन आत शिरले होते काय असा प्रस्नही कवठणकर यांनी केला. कॉंग्रेस राजवटीत सीमेवर एखादी घटना जरी घडली तरी मोठ मोठ्या गर्जना आणि चिथावण्या देणारे आता कुठे झोपले आहेत असे त्यांनी विचारले.
पर्रीकर यांना एक तर संरक्षणमंत्री म्हणून ठेवावे किंवा त्यांना कायमचा गोव्यात तरी पाठवावे, परंतु असे तळ््यात मळ््यात करणारे संरक्षणमंत्री म्हणून ठेवू नये अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात भाजप सरकारने जनतेचा विश्वास घात केला आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस या पक्षाकडे नाही. मोफत इंटरनेट देण्याच्या घोषणा ह्या त्यामुळेच करण्यात आल्या आहेत. परंतु मोफत इंटरनेट देऊन तरुणांची मते विकत घेता येतात या समजुतीत सरकारने राहू नये. गोव्यातील युवकही विकावू नाहीत आणि महिलाही गृहआधार घेऊन मते विकणार नाहीत असे त्यांनी सांगितले.