मुंबई : कोयना धरणातून वशिष्ठी नदीद्वारे समुद्राकडे वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईला आणण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. पूर्वीच्या आराखड्यानुसार करण्यात आलेला २,२६८ कोटींचा हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचा अहवालही प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.लक्षवेधी सूचनेद्वारे आशिष शेलार यांनी यासंबंधीचा विषय उपस्थित करून सभागृहात चर्चा घडवून आणली. कोयना प्रकल्पातील वाया जाणारे पाणी मुंबई महानगरपालिका व टंचाईग्रस्त भागास पुरविण्यासाठी कायमस्वरूपी योजना राबविण्याची मागणी शेलार यांनी केली. कोयना धरणातील ६७.५० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. त्यामुळे हे पाणी मुंबई परिसराकडे नेण्यासाठी कधी डीपीआर करणार, अशी विचारणा शेलार यांनी केली. या प्रकल्पास नदीजोड प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी राज्याने केंद्र सरकारला केली होती. त्यासाठी काही निकष शिथिल करण्याची विनंतीही केली होती. केंद्र सरकारने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे, असे मंत्री शिवतारे यांनी सांगितले. कृष्णा खोऱ्यातील पाणी अन्यत्र वळवू नये, अशी मागणी कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकारने राष्ट्रीय लवादाकडे केली आहे का, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यावर अशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा शिवतारे यांनी केला.
कोयनेचे पाणी मुंबईला आणण्यास तत्त्वत: मान्यता
By admin | Published: August 04, 2016 4:41 AM