लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मानसिक छळाला कंटाळून सिद्धान्त गणोरेने आई दीपालीची क्रूरपणे हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सिद्धान्तला शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सिद्धान्तने चांगला अभ्यास करावा यासाठी दीपाली सतत त्याला उपदेश करत असत. त्यामुळे आलेला दबाव, आईची वैयक्तिक जीवनातील ढवळाढवळ तसेच आई-बाबांचे सतत होणारे भांडण यामुळे कंटाळून सिद्धान्तने आईची निर्घृण हत्या केली. हत्येची कबुली त्याने अटकेच्या दिवशीच दिली होती. मात्र शिक्षण हे यामागील एकमेव कारण नसून हत्येमागचा मुख्य उद्देश वेगळा असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला. त्यासाठी सिद्धान्तला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली होती.शुक्रवारी सिद्धान्तला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळीही सिद्धान्त निर्विकारपणे उभा होता. पोलिसांच्या अहवालात सिद्धान्तने तब्बल १२ वार करून दीपाली यांची क्रूरपणे हत्या केल्याचे वाकोला पोलिसांना सांगितले. याव्यतिरिक्त तो पोलिसांना अधिक माहिती देण्यास तयार नाही. शिवाय पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू, त्याचे रक्ताने माखलेले कपडे ताब्यात घेत ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहेत. सोबतच सिद्धान्तने मृतदेहाशेजारी लिहिलेला मजकूर, त्याचे उमटलेले ठसे पडताळणीसाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.सिद्धान्तकडील चौकशी पूर्ण झाली असून, संबंधित अहवालावर पुढील तपास अवलंबून आहे. त्यामुळे सिद्धान्तच्या वाढीव पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचेही वाकोला पोलिसांनी स्पष्ट केले. सरकारी वकील अशोक मेढे यांनी या वेळी पोलिसांच्या वतीने युक्तिवाद केला. १० मिनिटे सुरू असलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सिद्धान्तला कोठडी सुनावली आहे.वडील मानसिक तणावाखालीसिद्धान्तचे वडील ज्ञानेश्वर गणोरे अजूनही नाशिकमध्येच आहेत. त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून, ते त्यातून बाहेर आलेले नाहीत. अद्याप त्यांच्याकडे पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशी केलेली नाही.
सिद्धान्तची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By admin | Published: June 03, 2017 3:19 AM