सांगली : आरग (ता. मिरज) येथील बनावट गुटखा उत्पादन कारखान्यावर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे पथकाने मंगळवारी पहाटे चार वाजता छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच कारखान्याचे मालक फिरोज मुसा जमादार, फारुख मुसा जमादार (रा. सुंदरनगर, मिरज) हे सख्खे बंधू पळून गेले. मात्र, राजस्थानमधील १६ कामगारांना ताब्यात घेण्यात यश आले. दहा लाख गुटख्याच्या पुड्या, मशिनरी, कच्चा माल असा सुमारे अडीच कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. आरगमधील जुन्या नरवाड रस्त्यावर गुटख्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने हा छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच कामगारांची पळापळ झाली, पण पथकाने सर्वांना घेरले. गुटखा तयार करीत असताना १६ कामगार रंगेहात सापडले. त्यानंतर कारखान्याची तपासणी सुरू केली. त्यावेळी ‘राज कोल्हापुरी’ व ‘यात्रा’ या कंपन्यांच्या गुटख्याच्या सुमारे दहा लाख पुड्या सापडल्या. एका पुडीची किंमत चार रुपये आहे. याशिवाय गुटखा तयार करणारी पाच यंत्रे दिसून आली. गुटखा तयार करण्यासाठी लागणारा दीडशे किलोहून अधिक कच्चा माल आढळून आला. हा सर्व माल पथकाने कारखान्यातच सील केला आहे. गुटखा कारखान्यासह जमादार बंधूंच्या घरावर तसेच त्यांच्या मिरजेतील भाडोत्री जागेवरही पथकाने छापे टाकले. पहाटे चार वाजता सुरू झालेली कारवाई रात्री नऊपर्यंत सुरू होती. घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. आणखी दोन दिवस ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)कर्नाटकात विक्रीआरगपासून अवघ्या दहा किलोमीटरवर कर्नाटकची हद्द सुरू होते. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही गुटखा उत्पादन व विक्री करण्यावर बंदी आहे. या कारखान्यात तयार होणाऱ्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती.गुटख्याचे उत्पादन रात्रीच जमादार बंधू केवळ रात्रीच कारखाना सुरू ठेवत असत. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी त्यांनी राजस्थानचे कर्मचारी आणले. येथे विजेची सोय नाही. त्यामुळे जनरेटर लावून गुटख्याचे उत्पादन घेतले जात. कारखाना कधीच बंद केला जात नव्हता. पोलिसांच्या कारवाईचा ससेमीरा मागे लागू नये, यासाठी तयार केलेला मालही ते रात्रीच कर्नाटकात पाठवत. जमादार बंधू हे बऱ्याच महिन्यांपासून गुटख्याचे उत्पादन घेत असावेत. त्यांच्यामागे मोठी असामी असण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय आहे. - वैशाली पतंगे, उपसंचालक, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे विभाग मिरज बनले केंद्रमिरज हे गुटखा निर्मिती व तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे. गुटखा निर्मितीसाठी तंबाखू, सुपारी पावडर असे ६० लाखांचे साहित्य नेणारा ट्रक काही दिवसांपूर्वी पकडला. अन्न व औषध प्रशासनाने सुगंधी तंबाखूचा साठा अनेकदा जप्त केला आहे.६७ कोटींचा कर चुकविलाबनावट गुटखा निर्मिती करून वर्षभरात सुमारे ६७ कोटींचा अबकारी कर चुकविण्यात आला असून, संबंधितांकडून दंडासह अबकारी करवसुलीसह बेकायदा गुटखा निर्मितीप्रकरणी कारवाईची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरगेत गुटखा कारखान्यावर छापा
By admin | Published: February 07, 2017 11:26 PM