सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबईएमएलएम मार्केटिंगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूक करून लोकांना झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवणाऱ्या ‘वन कॉइन’ कंपनीच्या १० ते १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेरुळ सेक्टर ४२ येथे या कंपनीचे सेमिनार सुरू असताना छापा टाकण्यात आला. नेरुळ सेक्टर ४२ येथील हॉलमध्ये हे सेमिनार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागामार्फत त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणावरून १२ ते १५ एजंट पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. बीट कॉइन या कंपनीच्या आधारावर २०१४ मध्ये वन कॉइन ही आॅनलाइन एमएलएम कंपनी विदेशात स्थापन झालेली आहे. ही मार्केटिंग कंपनी अनेक देशांत त्यांच्या एजंट्समार्फत जाळे पसरवत आहे. या कंपनीत होणारी गुंतवणूक ही आंतरराष्ट्रीय चलनाच्या दराच्या चढउतारावर ‘क्रिप्टो’ या चलनाशी आधारित आहे. गुंतवणूकदारांकरिता या कंपनीचे मोबाइल अॅपदेखील आहे, परंतु भारतात आर्थिक व्यवहाराची परवानगी नसतानाही ही कंपनी नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेत असल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या एजंट्सकडे पोलीस चौकशी करत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
‘वन कॉइन’वर छापा
By admin | Published: April 24, 2017 2:59 AM