अलिबाग : ‘दृकश्राव्य माध्यमांपेक्षा मुद्रित माध्यमांमध्ये सत्ता उलटून टाकण्याची क्षमता आहे. चुकीच्या बातमीने एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्थ होणार नाही. याची काळजी पत्रकारांनी घेतली पाहिजे,’ असे प्रतिपादन दूरदर्शनचे सहायक संचालक जयू भाटकर यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकारितेत उल्लेखनीय काम केलेल्यांच्या सत्कारांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.जग वेगाने बदलत आहे, त्यानुसार माध्यमांमध्येही बदल होत आहेत. सोशल मीडिया प्रगल्भ झाला आहे. वृत्तपत्रांची विश्वासाहर्ता आजही कायम असल्याने वृत्तपत्रांची किंमत कधीच करता येणार नाही. प्रवाहाच्या विरोधात काम करताना पत्रकारांनी समाजाचा आरसा बनले पाहिजे, असेही भाटकर यांनी सांगितले.जिल्ह्यातील बुजुर्ग व्यक्तींकडे प्रंचड अनुभव आहे. त्यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करून, ती ध्वनिमुद्रित करावी आणि सोशल मीडियावर टाकावी, अशी सूचनाही त्यांनी केली. कॅशलेस व्यवहार करण्यास भाजपा सरकार जोर देत आहे; परंतु दुसरीकडे सरकारी बँका त्यांचे ई-वॉलेट बंद करीत आहे. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या पेटीएम या खासगी संस्थेमध्ये भाजपाची ५१ टक्क्यांची भागीदारी असल्याचा गौप्यस्फोट अलिबाग येथील शेकापचे आमदार सुभाष पाटील यांनी केला.कोकणाला निधी देण्यामध्ये सरकारचे हात कचरतात. कोकणच्या पर्यटन विकासासही त्यांनी भरीव निधी दिला पाहिजे; परंतु कोकणच्या लोकप्रतिनिधींमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे त्यांचे फावते, अशी कबुलीही त्यांनी दिली.सरकार विदर्भ, मराठवाडा, पुरंदर येथे विमानतळ बांधण्यासाठी झटत आहे; परंतु कोकणातील सिंधुदुर्गमध्ये का करीत नाहीत? असा सवालही पाटील यांनी केला. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना प्रदूषणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून पत्रकारांनी याप्रश्नी आवाज उठविला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.‘लोकमत’चे कोकण समन्वयक जयंत धुळप यांना रोहा प्रेस क्लबचा राजाभाऊ देसाई शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नारायण मेकडे, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोदकर, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, शशी सावंत यांच्यासह अन्य मान्यवर, पत्रकार उपस्थित होते. ।पुरस्कार प्राप्त पत्रकारसाहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. माधव पोतदार यांना राजा राजवाडे पुरस्कार, म.ना.पाटील स्मृती पुरस्कार ‘लोकमत’चे महाड वार्ताहर सिंकदर अनावारे, ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील, तर उत्कृष्ट छायाचित्रकाराचा पुरस्कार राजेश डांगळे यांना. तर रायगडभूषण पुरस्काराने नुकतेच ‘लोकमत’चे पत्रकार आविष्कार देसाई, पत्रकार संतोष पेरणे यांना गौरविण्यात आले होते. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुद्रित माध्यमे सत्ता उलटवू शकतात
By admin | Published: January 07, 2017 2:57 AM