मुंबई : मुद्रित माध्यमाच्या (प्रिंट) वितरणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. एबीसीच्या (आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन) आकडेवारीनुसार मुद्रित माध्यमांच्या खपात गत आठ वर्षांत ५.०४ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. एबीसीकडून दर सहा महिन्यांनी प्रकाशकांच्या सर्क्युलेशनचा (वितरण) आढावा घेतला जातो. जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या काळात हा आढावा घेण्यात येतो. १९४८पासून गत ६८ वर्षांपासून ही माहिती सातत्याने घेतली जाते. एबीसीने प्रमाणित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात मुद्रित माध्यमांचा (एबीसीचे सदस्य प्रकाशन) विस्तार होत आहे, त्यात वाढ होत आहे. टेलिव्हिजन, रेडिओ, डिजिटल आवृत्त्यांची मोठी स्पर्धा असतानाही प्रिंट माध्यमाचा विस्तार होत आहे.आकडेवारी तपासण्याची एबीसीची ही पद्धत अतिशय कठोर आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या ९० जणांच्या पॅनलमधून याची तपासणी होते. त्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली जाते. सद्य:स्थितीत दैनिक आणि साप्ताहिकांचे ६६९ सदस्य आहेत. याशिवाय ५० मासिके दर सहा महिन्यांनी आपला अहवाल सादर करतात. एबीसीच्या अन्य सदस्यांत मीडिया एजन्सी, प्रिंट मीडियातील जाहिरातदार, सरकारच्या काही संस्था आणि डीएव्हीपी (डिरेक्टोरेट आॅफ अॅडव्हर्टायजिंग अॅण्ड व्ह्युज्युअल पब्लिसिटी) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)एबीसीच्या सदस्य प्रकाशकांच्या वितरणात गत आठ वर्षांत वार्षिक एकत्रित वाढ (कम्पाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट) ५.०४ टक्के झाली आहे. नवीन आणि सध्याचे प्रकाशक यांच्या वितरणातील ही वाढ आहे. काही प्रकाशकांच्या नव्या आवृत्त्या तसेच विविध ठिकाणांवरील नवे केंद्र यांचा यात समावेश आहे. एबीसीद्वारा प्रमाणित बहुतांश सदस्य (अनेक भाषांतील) यांची या काळात सकारात्मक वृद्धी दिसून आली आहे. जुलै ते डिसेंबर २०१५ आणि जानेवारी ते जून २०१५ या काळातील ही वितरणाची तुलनात्मक आकडेवारी आहे.
मुद्रित माध्यमांचा खप ५.०४% वाढला
By admin | Published: June 02, 2016 2:32 AM