नागपूर : कारागृहातील कॉइन बॉक्स फोन दहशतवादी व अन्य विशिष्ट कैद्यांना वापरू न देण्याचे शासकीय परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने योग्य ठरवले आहे. या संदर्भात मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील कैदी अशारत शफिक अहमद अंसारीने दाखल केलेली फौजदारी रिट याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.अंसारीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलता यावे, यासाठी राज्यातील नागपूरसह अन्य काही मध्यवर्ती कारागृहांमध्ये कॉइन बॉक्स फोन बसविण्यात आले आहेत. हा फोन कोणाला वापरू द्यायचा व कोणाला नाही, या संदर्भात कारागृह पोलीस महासंचालकांनी २३ एप्रिल २०१५ रोजी परिपत्रक काढले आहेत. त्यात कैद्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. परिपत्रकातील दहाव्या खंडात दहशतवादी, बॉम्बस्फोट व देशाविरुद्ध गुन्हे करणारे दोषी कैदी, नक्षली कैदी, युद्धातील कैदी, कुख्यात कैदी आणि अन्य विविध बाबींमुळे विशिष्ट कैद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कैद्यांना कॉइन बॉक्स फोनची सुविधा देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अंसारी या गटात मोडतो. यामुळे त्याला ही सुविधा नाकारण्यात आली आहे.६ आॅगस्ट २००९ रोजी सत्र न्यायालयाने झवेरी बाजार येथील बॉम्बस्फोट प्रकरणात अंसारीला विविध गुन्ह्यांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. अंसारीने आजारी आईशी बोलण्यासाठी कॉइन बॉक्स फोन वापरू देण्याची परवानगी मागितली होती. ती नाकारण्यात आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या परिपत्रकामुळे राज्यघटनेतील अनुच्छेद २१, १४ व १९मधील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे त्याचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)
कारागृहातील कॉइन बॉक्स फोन दहशतवादी कैद्यांसाठी नाही !
By admin | Published: January 04, 2016 3:12 AM