जमीर काझी, मुंबईराज्यातील मध्यवर्ती कारागृहासह सर्व लहान-मोठे कारागृह सध्या कच्च्या व पक्या कैद्यांनी तुडुंब भरून गेले आहेत. बंद्यांना ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा जवळपास १० हजार जण राहत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याउलट जेलमधील सुरक्षा आणि कैद्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मंजूर असलेल्यांपैकी जवळपास २५ टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या दोन्ही समस्यांचा परिणाम कारागृहातील सुरक्षा यंत्रणेवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रक्षकांवरील कामाच्या वाढत्या ताणाबरोबर कैद्यांच्या पलायनाच्या प्रमाणात वाढ होत आहे. तुरुंग प्रशासनाच्या मूलभूत सुविधांबाबत गृह विभागाचे होत असलेले दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नागपूर मध्यवर्ती कारागृहातून काल पाच कैद्यांनी पलायन केले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रकारच्या कारागृहांतील कैद्यांची क्षमता आणि प्रत्यक्षातील संख्या, त्याचप्रमाणे जेलची सुरक्षा, प्रशिक्षणासाठी मंजूर व कार्यरत पदांचा आढावा घेतला असता मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून १५ मार्चपर्यंतची आकडेवारी ‘लोकमत’च्या हाती लागली असून, त्यातील माहिती धक्कादायक आहे. सध्या राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे आहेत. एकूण क्षमता १४ हजार ८४१ असताना या दोन्हींची संख्या १८ हजार ९२० बंद्यांना ठेवण्यात आलेले आहे. १५ जिल्हा वर्ग-१ कारागृहे असून त्या ठिकाणची क्षमता ५,६५९ असताना प्रत्यक्षात ४,७०५ बंदी आहेत. तर १७ ब वर्ग कारागृहाची क्षमता ६४१ असताना या ठिकाणी ३,५२४ बंद्यांना ठेवण्यात आलेले आहे.
कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी
By admin | Published: April 02, 2015 5:07 AM