ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीने सत्र न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे. कैदी मंजुळा शेट्येवर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती इंद्राणी मुखर्जीने दिली आहे. तसंच मंजुळा शेट्येच्या गळ्याला ओढणी आवळून मारहाण केली. इतकंच नाही तर मंजुळा शेट्येच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करण्यात आल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने केला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर इंद्राणीने कारागृह प्रशासनाने मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली. सीबीआय न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्याचा, सोबतच तक्रार दाखल करण्यासाठी नागपाडा पोलीस ठाण्यात नेण्याचा आदेश दिला आहे.
इंद्राणीने केलेल्या तक्रारीची दखल घेत विशेष न्यायालयाने तिला बुधवारी न्यायालयात हजर करण्याचा आदेश कारागृह प्रशासनाला दिला होता. इंद्राणीची वकील गुंजन मंगला यांच्या म्हणण्यानुसार, त्या इंद्राणीला भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्या वेळी इंद्राणीने तिला मारहाण केल्याचे सांगितले. ‘तिच्या डोक्यावर, हातावर, पायावर व्रण आहेत. तसेच तिला कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी व अधीक्षकांनी शिवीगाळही केली,’ असे मंगला यांनी न्यायालयाला सांगितले होते.
Byculla jail violence matter: Indrani Mukherjea"s lawyer demands in court her statement be recorded&medical examination be done immediately— ANI (@ANI_news) June 28, 2017
मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणी नागपाडा पोलिसांनी इंद्राणीसह अन्य काही महिला कैद्यांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. या दरम्यान मंजूळाला पोलिसांकडून होत असलेली मारहाण पाहून भितीने बरॅकमध्ये पळ काढल्याचा जबाब इंद्राणीने पोलिसांना दिला होता.
वॉर्डन मंजूळा शेट्येच्या हत्याप्रकरणात नागपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडूनही अंतर्गत चौकशी सुरु आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी भायखळा कारागृहात कैद आहे. मंजूळा शेट्येच्या हत्याप्रकरणात नागपाडा पोलिसांनी तिचाही जबाब नोंदवला होता.
सकाळी बरॅकमध्ये असताना अचानक जोराचा आवाज झाला. याच आवाजामुळे आम्ही सारे जण बाहेर आलो. तेव्हा मंजूळाला अमानूष मारहाण सुरू होती. ही मारहाण पाहून मी घाबरली. तसेच पोलिसांचे रौद्ररुप पाहून मी बरॅकमध्ये लपून बसल्याचे इंद्रायणीने पोलिसांना सांगितले होते.
हत्याप्रकरणात तक्रारदार मरियम शेखने दिलेल्या जबाबानुसार इंद्राणीचा जबाबातील माहिती सारखीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंजूळाच्या हत्येप्रकरणी इंद्राणीला नागपाडा पोलीस साक्षीदार बनविणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे.
याच कारागृहात रमेश कदम यांची बहिण वैशालीही आहे. मंजूळाच्या हत्येनंतर घडलेल्या दंगलीप्रकरणी इंद्राणीसह वैशाली आणि २९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या दंगलीमध्ये एकूण ७ पोलीस जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन नागपाडा पोलीस ठाण्याचे आहेत. तर ४ कारागृहातील कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.