ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या करणाऱ्या सिराज अलम रमजानअली शेख (२७) या बंदीवानाचे मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, एक वर्षापासून जामीन होत नसल्याने वैफल्यग्रस्त झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची शक्यता आहे.मुंबईच्या बोरिवलीतील एका मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला २०१५ मध्ये समतानगर पोलिसांनी अटक केली होती. ताब्यात घेत असताना, त्याने मिळालेल्या संधीचा फायदा उचलून तिथून पळ काढला होता. याचदरम्यान, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची रवानगी तळोजा कारागृहात झाली. तिथून फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आणले होते. येथील फॅक्टरीत छोटे-मोठे काम तो करीत असे. नेहमीप्रमाणे सोमवारीही तो इतर बंदीवानाप्रमाणे काम करण्यास गेला होता. तेव्हाच त्या फॅक्टरीच्या मागील शौचालयात जाऊन त्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी कारागृह प्रशासनाकडून बंदीवानांची मोजणी करण्यात आली, त्यावेळी एक जण कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर बॅरेज, फॅक्टरीत येथे शोध घेतला असता तो शौचालयात आढळला.
जामिनाच्या प्रतीक्षेत वैफल्यग्रस्त झाल्याने कैद्याची आत्महत्या
By admin | Published: September 21, 2016 3:52 AM