ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.१८- समाजात सर्वच गुन्हेगार नसतात, काहींना परिस्थितीही जेलात पाठविते अशांना राखी पोर्णिमेच्या दिवशी बहिणीची आठवण झाल्यानंतर त्यांनाही कोणी राखी बांधण्यास यावे अशी अपेक्षा असतेच. याच उद्देशाने वाशिमच्या निर्भया पथकाच्या वतीने कैद्यांना १८ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राखी बांधण्यात आल्या. यावेळी अनेक कैद्यांचे डोळे पाणावले होते. काहींनी ताई आमच्याकडे तुला दयायला काही नाही असे म्हणून कारागृह परिसरात असलेल्या झाडाचे फूल तोडून भेट दिले.
निभर्या पथकाच्या प्रमुख नम्रता राठोड यांनी कैदयांना राख्या बांधण्यासंदर्भात कारागृह अधिक्षक रामराजे चांदणे यांच्याकडे विचार मांडला. रामराजे चांदणे यांनी सुध्दा सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देत कैदयांना राख्या बांधण्याची परवानगी दिली. कैदयांना निभर्या पथक प्रमुख नम्रता राठोड व इतरांनी राख्या बांधल्या असता कैदयांना आपल्या बहिणीची आठवण आल्याचे त्यांच्या चेहºयावरुन दिसून येत होते. यावेळी पोलीस विभागाचे कर्मचारी अरखराव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.