- डिप्पी वांकाणी, मुंबईभाववाढीमुळे गरिबाघरी डाळ शिजणे मुश्कील झाले असले तरी महाराष्ट्रात तुरुंगातील कैद्यांच्या आहारात डाळी आणि गव्हाचे प्रमाण वाढविण्याची आग्रही शिफारस आहारतज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीने राज्य सरकारला केली आहे. या शिफारशींचा प्रस्ताव संमतीसाठी सरकारकडे पाठविण्यात आला आहे. कैद्यांना कोणते अन्नपदार्थ दिले जावेत याचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशी मान्य होताच नाश्त्यात कैद्यांना यापुढे पोहे दिले जातील. शिवाय दिवसातून दोनदा चहा आणि बालकैद्यांना डाळी आणि गव्हाचे पदार्थ दिले जातील. कैद्यांनी रोज किती उष्मांक घ्यावेत याचा अभ्यास समितीने आंतरराष्ट्रीय निकष समोर ठेवून केला होता. कैद्यांना रोज सकाळी सहा वाजता नाश्ता, सकाळी ११ वाजता जेवण आणि सायंकाळी ६ वाजता (किंवा सूर्यास्तापूर्वी) रात्रीचे जेवण दिले जाते. सध्या चहा एकदाच दिला जातो. आता तो दोन वेळा दिला जावा अशी शिफारस करण्यात आली आहे. जेवण आणि रात्रीच्या जेवणात पोळ्या, भाजी, वरण आणि भाताचा समावेश आहे. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा आणि शिरा असतो. मांसाहारी पदार्थ वर्षातून फक्त सहा वेळा बनविले जातात आणि तेही कैद्यांना विकत घ्यावे लागतात.कैद्यांना काही बदल हवे असल्यामुळे आम्ही खाद्यपदार्थांमध्ये विविधता आणली आहे. कैद्यांनी सांगितले की आम्हाला उपम्याऐवजी पोहे आवडतील म्हणून आम्ही त्यांना ते देणार आहोत, असे तुरुंगाच्या सूत्रांनी सांगितले. पोलीस महासंचालक (तुरुंग) बी. के. सिंह म्हणाले की, ‘‘माझ्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांचा समावेश होता. समितीने शिफारशी केल्या असून तपशीलवार प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.’’
कैद्यांच्या आहारात वाढणार डाळी
By admin | Published: October 21, 2015 3:21 AM