मुंबई: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांच्या नाराजीमुळे लांबल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा दावा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. मात्र यापुढेही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुढे गेली, तर नवल वाटायला नको, कारण तीन पक्षाच्या सरकारमध्ये अंतर्गत अनेक वाद आहेत, बाहेरुन काही दिसलं तरी अनेक विषयांवर वाद असल्याने महाविकास आघाडीची खरी परिस्थिती लवकरच कळेल, असा दावा निलेश राणेंनी केला आहे.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील अनेक प्रमुख नेते नाराज आहेत, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आपल्या नेत्यांची नाराजी बाहेर येऊ देत नसले तरीही सर्व सत्य लवकरच बाहेर येईल असेही राणे म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना प्रत्येक निर्णय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारूनच घ्यावा लागत आहे. त्यामुळे पवार म्हणाले उठा, तर उठणार आणि बसा म्हणाले तर बसणार. तर मुख्यमंत्री ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कठपुतली असल्याचा घणाघात निलेश राणेंनी केला.