Congress Devendra Fadnavis: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही संविधान बदलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून महाराष्ट्रातील सभांमध्येही संविधानाची प्रत दाखवली गेली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. राहुल गांधींचे संविधान लाल रंगाचे असल्याचे सांगत त्याचा शहरी नक्षलवादाशी संबंध फडणवीसांनी लावला. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. फडणवीसांची टीका, पृथ्वीराज चव्हाणांनी दाखवला फोटो
राज्यघटनेची प्रत निळ्या रंगाची आहे, पण राहुल गांधी लाल रंगाची दाखवतात, या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फोटो पोस्ट करत उत्तर दिले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी यांनी कोविंद यांना राज्य घटनेची प्रत भेट देत आहेत. राज्य घटनेचे हे पुस्तक लाल रंगात आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
फोटो पोस्ट करत पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे की, "संविधान हे पवित्र असून तो आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत हे दुर्दैवी आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकांकडे संविधान असले पाहिजे. या उद्देशाने राहूल गांधीं संविधानची प्रभावीपणे जनजागृती करीत आहेत."
"ह्याच पॉकेट संविधानाची एक प्रत स्वत: प्रधानमंत्री मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिली होती. याबाबत फडणवीस यांचे काय मत आहे?", असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणालेले?
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांनी घेरले आहे. राहुल गांधी आता काँग्रेसवाले राहिलेले नाहीत. भारतीय राज्यघटना निळ्या रंगाची असताना, ते लाल रंगात असलेले राज्यघटनेचे पुस्तक दाखवत असतात. लाल रंग दाखवून ते कोणता संकेत देतात, संदेश देतात?", असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला होता.