सिंधुदुर्गनगरी : राज्यामध्ये सत्तेत असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले काय ज्याने परत सत्ता येईल. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसला सत्ता देईल या भ्रमात त्यांनी राहू नये असा सल्ला खासदार नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला दिला. काँग्रेसने सध्या सत्ता बदलून घेण्यासाठी जन संघर्ष यात्रा सुरू केली आहे, या पार्श्वभूमिवर ते पत्रकारांशी बोलत होते. पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार नीतेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.कोल्हापूर येथून शुक्रवारपासून काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू झाली. या पार्श्वभूमिवर बोलताना राणे म्हणाले, काँग्रेस सत्तेत असताना काही करू शकली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना चांगले काम केले असते. तर जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले असते. आता जनसंघर्ष यात्रा काढून त्याचा काही फायदा काँग्रेसला होईल, असे आपल्याला वाटत नाही.मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या स्थितीबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले, हा महामार्ग गणपतीच्या अगोदर व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लेखी पत्र दिले आहे. महामार्गाची दुरावस्था होणे याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची आहे. ठेकेदाराने लक्ष न दिल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे असा ठेकेदार असू नये असे आपले मत आहे. आज जिल्ह्यात मंत्री चंद्रकांत पाटील येत आहेत त्यांची कणकवली येथे आपण भेट घेणार आहोत. त्यावेळीही या स्थितीबाबत आपलं मत मांडणार असेही राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. १२ सप्टेंबर रोजी चिपी विमानतळावर विमानाची चाचणी होणार आहे. त्याठिकाणी आवश्यक त्या प्राथमिक सुविधा तयार करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी आपल्याला १२ सप्टेंबर रोजी तिथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी त्यादिवशी तिथे उपस्थित राहणार असेही राणे यांनी यावेळी स्पस्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत आचारसंहिते अगोदर प्रतिज्ञापत्र सादर करावे मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी विचारले असता नारायण राणे म्हणाले मराठा आरक्षण हा विषय पुढे पुढे ढकलून चालणार नाही. खरे म्हणजे महाराष्ट्र शासनाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून हा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी डिसेंबर जानेवारी असे करत राहण्याची आवश्यकता नाही. आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे. त्यामुळे आचार संहितेच्या अगोदर हे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात हजर करावे, अन्यथा निवडणुकांमध्ये त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते म्हणाले.सी वर्ल्ड प्रकल्प आम्ही गुंडाळू देणार नाहीसी वर्ल्ड प्रकल्प गुंडाळला जाणार याबाबत चर्चा आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता हा प्रकल्प आपण कसाच गुंडाळू देणार नाही. तसे मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे. लवकरच संयुक्त बैठक होईल आणि त्यात पुढील दिशा ठरेल असेही राणे यांनी यावेळी स्पस्ट केले.