सातारा : आमच्या पाठिंब्यावर ज्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते, त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे सत्ता गमवावी लागली,’ असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पराभवावरून कलगीतुरा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी याची सुरुवात केली. निवडणुकीतील पराभवाचे खापर काँग्रेसच्या माथी मारून ते मोकळे झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’मधून जशाच तसे उत्तर दिले.अजित पवार हे रविवारी सातारा जिल्ह्यात आले होते. शिवथर, पळशी, आणि भोसे येथे त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. यावेळी पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. ते म्हणाले, आमच्या पाठिंब्यामुळे जे मुख्यमंत्री बनले त्यांच्याच चुकीच्या धोरणाचा फटका आम्हाला बसला. (प्रतिनिधी)>मराठा आरक्षणासाठी मोर्चा हवाच...सध्याच्या सरकारकडून युवकांना रोजगार मिळत नाही. अंगणवाडी सेविकांच्या मागणीला तर वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत, असे सांगून पवार म्हणाले, आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे शांततेत मोर्चे निघत असतील तर निघू देत. कोणी विरोध करण्याचे कारण नाही. मराठा समाजाबरोबर धनगर समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाची मागणी करत महादेव जानकर मंत्री झाले, पण सरकार दखल घेत नाही, असेही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांमुळेच सत्ता गमावली
By admin | Published: September 19, 2016 4:48 AM