मुंबई:काँग्रेस नेतृत्वात बदलाची मागणी करणाऱ्या आणि गांधी कुटुंबाला विरोध करणाऱ्या पक्षाच्या G-23 गटातील आणखी एका नेत्याने पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, ते गेल्या 4 वर्षांपासून राहुल गांधींना एकदाही भेटू शकले नाहीत. तसेच, उदयपूर येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात आत्मपरीक्षण करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
'राहुल गांधी भेटले नाहीत'टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, "मी जेव्हाही दिल्लीत राहतो तेव्हा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना भेटतो. त्यांची तब्येत आता पूर्वीसारखी नसली तरी ते नेहमी बोलायला-भेटायला तयार असतात. जेव्हा मी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली, तेव्हा त्याही मला भेटल्या. पण जवळपास 4 वर्षे झाली, या काळात मी राहुल गांधींना भेटू शकलो नाही", असं चव्हाण म्हणाले.
'आत्मपरीक्षणास तयार नाहीत'उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. मात्र पक्षातील काही नेत्यांच्या बोलण्यातून त्यांना आत्मपरीक्षणाची गरज नसल्याचे जाणवले. चिंतन शिबिरात प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवे होते, असे माझे मत आहे. एखाद्याला लक्ष्य करण्यापेक्षा, अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे," असेही ते म्हणाले.