मुंबई : स्वत:च्या मालकीच्या भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसन एसआरए योजनेमार्फत निविदा काढण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला मुंबई मंडळांकडून हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वांद्रे रिक्लेमेशन येथील नित्यानंदनगरातील एसआरए योजना पुनर्वसनासाठी कसल्याही टेंडरविना मे. विझार्ड कन्स्ट्रक्शनला बहाल केला असून, प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. रिक्लेमेशनजवळील ओएनजीसी कॉलनीशेजारी नित्यानंदनगरामधील सीटीएस क्र. अ/७९१(भाग) अ ब्लॉकच्या म्हाडाच्या जागेवर ३००वर झोपड्यांचे पुनर्वसन करण्याच्या ‘विझार्ड’च्या प्रस्तावास मुंबई मंडळाने मंजुरी दिली आहे. म्हाडा व विकासकासाठी ५१:४९ या तत्त्वानुसार ही योजना राबविण्यात येणार असून, त्यातून हजारावर घरे निर्माण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. तर वांद्रे रिक्लेमेशनच्या एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण असलेल्या या भूखंडावरील २५ टक्के जमिनीचे अधिमूल्य म्हाडाला मिळणार आहे. मुंबईत तयार घरांचा तुटवडा होऊ लागल्याने म्हाडा प्राधिकरणाने गेल्या वर्षी ६ आॅगस्टला झालेल्या बैठकीमध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मालकीच्या अतिक्रमित जमिनीवरील पुनर्विकास स्वत: करण्याचा निर्णय ठराव क्र. ६६११ अन्वये मंजूर करण्यात आला. त्यानुसार नित्यानंदनगरातील झोपड्या वरील पुनर्वसनासाठी निविदा मागवून विकासकाची नियुक्ती करण्याची आवश्यकता होती. मात्र त्याबाबत काहीही कार्यवाही न करता मंडळाच्या कार्यकारी अभियंता-२ यांनी त्याबाबत मे. विझार्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्याला अंतिम हिरवा कंदील मिळण्यासाठी प्राधिकरणाच्या आगामी बैठकीमध्ये ही फाईल सादर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
म्हाडाच्या एसआरए योजनेसाठी टेंडरविना खासगी बिल्डर?
By admin | Published: July 02, 2014 4:41 AM