मुंबई : गेल्या १८ दिवसांपासून संपावर गेलेल्या अशासकीय आयटीआय कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी घेतलेली बैठक सकारात्मक चर्चेनंतरही निष्फळ ठरली आहे. कारण लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य, कर्मचारी संघटनेने गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते म्हणाले की, वेतन अनुदानाच्या प्रश्नावर बुधवारी कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्र्यांनीही संघटनेची बाजू ऐकून घेतली. शिवाय मागणीवर निर्णय घेण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र याआधी दोनवेळा शासनाकडून संघटनेची फसवणूक झाल्याने आंदोलन मागे घेणार नसल्याचे संघटनेने ठरवलेले आहे. संघटनेच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २ फेब्रुवारीला धडक मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी मध्यस्थी करत संघटनेच्या दोन्ही बैठका आयोजित केल्याचे संघटनेचे मार्गदर्शक भगवानराव साळुंखे यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरकारने चर्चेचे एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र ते पुरेसे नसून पाटील यांनी मोर्चाला सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे महामोर्चाचे रुपांतर पाटील यांनी मेळाव्यात करावे, असे संघटनेचे आवाहन आहे.ते आयटीआय सुरूच राहणारसुमारे ५० आयटीआय संपात सामील झाले नसल्याचे संघटनेने सांगितले. कारण २० ते २५ ख्रिश्नच मिशनरींमार्फत चालवण्यात येणाऱ्या आयटीआयने संपाला केवळ नैतिक पाठिंबा दिला आहे. संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान नको, म्हणून परीक्षा केंद्र असलेले आयटीआय सुरू राहणार असून येथील कर्मचारी काळ््या फिती लावून काम करणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
खाजगी आयटीआय महामोर्चा काढणार
By admin | Published: January 29, 2016 2:18 AM