अमरावती : जानेवारी ते २३ आॅगस्टदरम्यान राज्यात एसीबीने ५४८ सापळे यशस्वी केले. त्यात लाचखोरी वर्ग १ व वर्ग २ च्या तुलनेत खासगी व्यक्ती अव्वल राहिले. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी लाचेसाठी खासगी व्यक्तींच्या खांद्याचा वापर तर करत नाहीत ना, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.आपण एसीबी सापळ्यात अडकू नये आणि अडकलोच तर खासगी व्यक्तींवर ते बालंट ढकलू द्यायचे, या मानसिकतेतून स्वत: सहीसलामत राहण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर अत्याधिक होऊ लागल्याचे निरीक्षण एसीबीने नोंदविले आहे. एसीबीने जानेवारी ते २३ आॅगस्ट २०१८ दरम्यान राज्यात एकूण ५४८ प्रकरणे उघड केलीत. त्यात वर्ग १ चे ४८, वर्ग २ चे ०४, वर्ग ३ चे ४५५, वर्ग ४ चे २८ व तब्बल ८७ खासगी व्यक्ती अडकली. वर्ग १ व वर्ग २ च्या लाचखोर अधिका-यांपेक्षा खासगी व्यक्तींचा आकडा अधिक आहे. या ५४८ प्रकरणांमध्ये एकूण ९७.६५ लाख रुपये जप्त करण्यात आले. यात नेहमीप्रमाणे महसूल, पोलीस व महावितरणचे अधिकारी-कर्मचारी लाचखोर निघाले. मात्र, त्याचवेळी या तीन विभागांत अनुक्रमे १८, १६ व १० खासगी व्यक्ती एसीबीच्या सापळ्यात अडकल्या. त्यामुळे अनेक अधिकारी-कर्मचारी लाच घेण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर अर्थात त्यांच्या खांद्याचा वापर करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१७ मध्ये १३७ खासगी व्यक्ती लाचखोरसन २०१८ च्या आॅगस्टपर्यंत ८७ खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्या, तर २०१७ मध्ये राज्यात हा आकडा १३७ होता. त्यापूर्वी २०१६ मध्ये १२० खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली. २०१५ मध्ये २१९, २०१४ मध्ये २०५ तर सन २०१३ मध्ये ८७ खासगी व्यक्तींवर एसीबीने सापळा टाकला.
लाचखोरीत खासगी व्यक्ती अव्वल, अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून खांद्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 9:59 PM