यवतमाळ : कोविडच्या संकटाने एसटीच्या उत्पन्नात घट झालेली असताना स्वमालकीच्या बस उभ्या ठेवून खासगी शिवनेरी, शिवशाही आणि अश्वमेघ बस प्रवासी नसतानाही मार्गावर सोडल्या जात आहेत. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असताना या बसवर मेहरबानी दाखविली जात असल्याने महामंडळाचे आर्थिक देऊळ पाण्यात आले आहे.शासनाने लागू केलेल्या कडक संचारबंदीमुळे प्रवासी संख्या घटली आहे. महामंडळाने वाहतूक पूर्णत: थांबविली नसली तरी, प्रवासी मिळाले तरच बस सोडण्याचे नियोजन काही ठिकाणी एसटीच्या स्थानिक प्रशासनाने केले आहे. भाडेतत्त्वावरील खासगी शिवनेरी, शिवशाही या वातानुकूलित बस या प्रवासी असो वा नसोत, धावत आहेत. स्वमालकीच्या शिवनेरी, शिवशाहीची चाके मात्र रुतलेली आहेत. भाडेतत्त्वावरील बसचा डिझेल आणि टोलचा खर्च महामंडळ करते आणि दुहेरी फेरीचे किलोमीटरप्रमाणे भाडे दिले जाते. फेरीमागे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. तरीही महामंडळाची सर्व ‘धाव’ खासगीकडेच आहे. काही अधिकाऱ्यांकडून एसटीच्या हिताला बाधा पोहोचविली जात आहे. प्रवासी नसले तरी गाडी सोडण्याची सक्ती केली जात आहे.
खासगी ५० शिवनेरी व २१४ शिवशाहीमहामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या ९२ शिवनेरी आणि ९०० शिवशाही बस आहेत. तरीही खासगीचे लाड पुरविले जात आहेत. एसटीच्या ताफ्यात खासगी शिवनेरींची संख्या ५० एवढी आहे. त्यातील ३० विविध मार्गांवर सोडल्या जात आहेत. या बसला प्रतिकिलोमीटर २२ ते २४ रुपये भाडे दिले जाते. एखादी शिवनेरी १०० किलोमीटर धावली तरी, दिवसाला ३०० किलोमीटरचे भाडे चुकवावेच लागते. भाडेतत्त्वावरील शिवशाही २१४ आहेत. त्यातील १२५ कार्यरत आहेत. शिवशाहीचे ३०० किलोमीटरसाठी १९ रुपये, ५०० किलोमीटरसाठी १५, तर ८०० किलोमीटरला प्रतिकिलोमीटर १३ रुपये भाडे द्यावे लागते.
दोन आठवड्यांचे उत्पन्न सहा लाखभाडेतत्त्वावर असलेल्या १५५ बसने एसटीला दोन आठवड्यांत केवळ पाच लाख ९४ हजार ९६० रुपये एवढे कमी उत्पन्न दिले आहे. या वाहनांवरील प्रत्यक्षात झालेला खर्च कोटींच्या घरात आहे. शिवनेरीच्या ३० बसवर दरदिवसाला सुमारे दोन लाख १६ हजार रुपये एवढा खर्च झालेला आहे. दोन आठवड्यांचा हा खर्च ३२ लाख ४० हजारांपेक्षा अधिक जातो.
एसटीच्या वाहतूक शाखेकडून भाडेतत्त्वावरील बस अत्यंत कमी भारमानावर चालविल्या जात आहेत. महामंडळाच्या तोट्यात नाहक भर पडत आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील खासगी शिवनेरी, अश्वमेघ आणि शिवशाही बस त्वरित बंद केल्या पाहिजेत. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळ अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्याकडेसुद्धा ही मागणी करण्यात आली आहे.- हिरेन रेडकर,सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना