ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २५ : भारतातील हज यात्रेकरूंसाठी सौदी सरकारच्या हज मंत्रालयाकडृन व्हीसा मिळणे सुरळीत झाले तर देशातील विविध खासगी टूर आॅपरेटर्सच्या माध्यमातून ३६ हजार यात्रेकरून हज यात्रेला जातील. या आॅपरेटसना यात्रेकरूंचा कोटा मिळण्यासही विलंब झाला आहे. त्यामुळे १० आॅगस्टपासूनच यात्रेच्या प्रवासाला प्रारंभ होईल, अशी माहिती आॅल इंडिया हज टूर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शौकत तांबोळी यांनी लोकमतला दिली.
व्हीसा पध्दतीचे संगणीकरण झाल्यामुळे यंदा तो मिळण्यास उशीर झाला असून, भारतातील यात्रेकरूंसाठी सौदी सरकारकडून १ लाख ३६ हजार व्हीसा अपेक्षित आहेत. तांबोळी यांनी सांगितले की, यापैकी एक लाख यात्रेकरू केंद्र सरकारच्या हज कमिटीच्या माध्यमातून यात्रा करतील तर ३६ हजार यात्रेकरूंना खासगी टूर्सने जावे लागणार आहे.
व्हीसा मिळणे सुरळीत झाल्यानंतर मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथून एअर इंडियाची विमाने हजला रवाना होतील. मुंबई येथून २७ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान ४२० प्रवासी क्षमतेच्या १० फ्लाईटस् हजला जातील; तर औरंगाबाद येथून नाथ एअरवेजच्या माध्यमातून ३० आॅगस्ट ते ५ नोव्हेंबरदरम्यान २७५ आसन क्षमतेच्या ९ फ्लाईटस् हजकडे जातील. नागपूर येथून ४२० आसन क्षमतेची ३ विमाने २५ ते २७ आॅगस्टदरम्यान रवाना होतील. खासगी टूर्स आॅपरेटर्स १० आॅगस्ट ते ५ नोव्हेंबरदरम्यान विमानातील आरक्षणानुसार आपल्या यात्रेकरूंना हजला पाठवतील, असे तांबोळी यांनी सांगितले.-मक्का, मदिनाला मिळणार सिमकार्डस्खासगी टूर्स आॅपरेटर्सना महाराष्ट्रातील यात्रेकरूंचा मोठा प्रतिसाद मिळतो. राज्यातील १५ हजार यात्रेकरू आमच्या माध्यमातून हज यात्रा करतील, असे सांगून तांबोळी म्हणाले की, यंदा मोबाईल सिमबाबत सौदी सरकारने काळजी घेतली असून, आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळे यात्रेकरूंना मक्का, मदिना आणि जिद्दा येथे फिंगर प्रिंटस् घेऊनच सिम कार्डस् देण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे.