मुंबई : रत्नागिरीतील दाभोळ वीज प्रकल्पाच्या खासगीकरणासह इतर पर्याय खुले असल्याचे केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.दाभोळ प्रकल्पाबाबत येत्या १५ दिवसांत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रकल्पाशी संबंधित बँकांसह सर्वांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे गोयल म्हणाले. वीज ग्राहकांचा विचार करून ज्या पर्यायात ग्राहकांना स्वस्त वीज मिळेल, तो स्वीकारण्यावर भर दिला जाईल. त्यात खासगीकरणाचा पर्याय समोर आला तर त्याच्यावरही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाला सध्या गॅसपुरवठ्याचा तुटवडा भासत आहे. एकंदरीत देशातच गॅसचा पुरवठा सध्या कमी झाला आहे, असे ते म्हणाले. देशात वीज ग्राहकांना एकापेक्षा अधिक वीज कंपन्यांकडून वीज घेण्याची मुभा देण्यास वीज कायद्यात दुरुस्ती केंद्राने प्रस्तावित केली आहे. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक संमत व्हावे हा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे सध्या मोबाइल कंपन्यांबाबत ग्राहकांना असलेली मुभा उद्या वीज कंपन्यांबाबतही मिळेल, असे ते म्हणाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५.८ टक्के वीज उत्पादन वाढल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
दाभोळ वीज प्रकल्पाचे खासगीकरण शक्य
By admin | Published: January 16, 2015 6:06 AM