मुंबई : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकीकडे मुंबई काँग्रेसने पालिकेच्या कारभारावरुन ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असतानाच प्रिया यांनी थेट मातोश्री गाठल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या भेटीमागे कसलेच राजकारण नाही. ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याने वैयक्तिक स्तरावर भेट घेतल्याचे प्रिया दत्ता यांनी स्पष्ट केले. या भेटीत उद्धव यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे त्यांनी सांगितले. दत्त यांनी अचानक दिलेल्या भेटीमागे आगामी राज्यसभा निवडणुकांचे राजकारण असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.मुंबई काँग्रेसने पालिका कारभारावरुन पोल-खोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट ‘मातोश्री’ला लक्ष्य केले आहे. शनिवारी रात्री कांदिवली येथील पोल-खोल कार्यक्रमात शिवसैनिकांनी गोंधळ घातला.मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी ठाकरे-दत्त भेटीबद्दल कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र, प्रिया दत्त यांना कोणत्याही नेत्याची व्यक्तिगत भेटी घेण्याचा अधिकार आहे. तरीही, या भेटीबाबत दत्त यांच्याशी चर्चा करणार असल्याचे निरुपम यांनी सांगितले.
प्रिया दत्त ‘मातोश्री’वर !
By admin | Published: May 16, 2016 2:03 AM