नागपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा पक्षाच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘नॉलेज सिरीज’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी झालेल्या ‘इंडिया अॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी त्या नागपुरात आल्या होत्या. काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विकास, भ्रष्टाचार व समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशची झालेली दुर्दशा हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील. तसेच, महिला व युवा सशक्तीकरणावर भर दिला जाईल. उत्तर प्रदेशातील मतदारांचा काँग्रेसला भक्कम पाठिंबा आहे. यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा चतुर्वेदी यांनी केला.आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ व पुदुचेरी येथील निवडणुकांतून काँग्रेसबाबत अनेक सकारात्मक बाबी पुढे आल्या. आसाम येथे काँग्रेसचा पराभव झाला असला तरी, नागरिकांचा पाठिंबा कमी झाला नाही. शिवाय कोणत्याही पक्षाला एका राज्यात चौथ्यांदा विजय मिळविणे कठीण असते. आसाम येथे काँग्रेसने १५ वर्षे राज्य केले. पश्चिम बंगाल व केरळ येथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. पुदुचेरीत काँग्रेसचे शासन आले असून तामिळनाडूमध्येही अनेक जागांवर विजय मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यामध्ये काँग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांच्यामुळे पक्षातील युवकांमध्ये आत्मविश्वास जागृत झाला आहे. इतर पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला काहीच महत्त्व नाही. परंतु, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार की, नाही यावर आताच काही बोलता येणार नाही. असे निर्णय काँग्रेस कार्यकारिणी घेते. मात्र, राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सांभाळावे यावर सर्वांचे एकमत आहे, असे सांगून चतुर्वेदी म्हणाल्या, वरिष्ठ नेत्यांकडे भाजपाप्रमाणे दुर्लक्ष केले जाणार नाही. ते पक्षाचा आधारस्तंभ आहेत. त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील, असे चतुर्वेदी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात काँग्रेसचा विजय निश्चित- प्रियांका चतुर्वेदी
By admin | Published: June 06, 2016 3:15 AM