नवी दिल्ली - आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपआपले उमेदवार निश्चित केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचे वर्चस्व दिसून आले आहे. अर्थात पक्षांतराचा उमेदवारी मिळालेल्या नेत्यांना फायदा झाल्याचे दिसून येत आहे. तर पक्षासोबत कायम राहणाऱ्या नेत्यांना डावलण्यात आले आहे. पक्षांतराचा सर्वाधिक फायदा शिवसेनेच्या महिला नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना झाला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियंका यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. शिवसेनेच्या अमराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच त्या शिवसेनेकडून राष्ट्रीय पातळीवर अनेकदा बोलताना दिसतात. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसनेच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिवाकर रावते इच्छूक होते. मात्र या दिग्गज नेत्यांना शिवसेनेकडून डावलण्यात आले असून प्रियंका यांना झुकते माप देण्यात आले.
प्रियंका चतुर्वेदी काँग्रेसमध्ये असताना रणदीप सुरजेवाला यांच्या नेतृत्वात मीडिया टीममध्ये काम करत होत्या. सुरजेवाला यांच्यासोबत अनेकदा त्यांनी पत्रकार परिषदा देखील घेतल्या आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत सामील झाल्या. त्यांना लगेच शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी रणदीप सुरजेवाला यांचा हरियाणामधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पत्ता कट झाला आहे. येथून दीपेंद्र हुड्डा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रियंका यांना पक्षांतराचा एका वर्षातच फायदा झाला. तर सुरजेवाला अजुनही आहे तिथेच आहे. प्रियंका यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. एकूणच राज्यसभेवर जाण्यासाठी पक्षांतराचा फॉर्म्युला अनेक नेत्यांना फायदेशीर ठरला आहे.