प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 04:14 PM2024-11-16T16:14:37+5:302024-11-16T16:16:04+5:30
आज शिर्डी येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आव्हान दिले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आज शिर्डी येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आव्हान दिले.
प्रियांका गांधी म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी माझ्या भावासंदर्भात वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात. मी राहुल गांधींची बहीण आहे. मी म्हणते, मोदीजी ऐका, बाळासाहेब ठाकरेजींचे नाव ऐकून घ्या. आणि हेही ऐका, हो आमची विचारधारा वेगळी होती. आमचे राजकीय विचार वेगळे होते. मात्र, ना बाळासाहेब ठारे, ना राहूल गांधी, ना आजचा काँग्रेसचा कुठलाही नेता, शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही."
याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान देताना प्रियांका म्हणाल्या, "माझं ही एक आव्हान ऐका, मीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आव्हन देते की, त्यांनी व्यासपीठावर उभे राहून सांगावे की, ते जतनिहाय जनगणना करवतील, त्यांनी व्यासपीठावर उभे राहून सांगावे की, ते आरक्षणाची जी 50 टक्क्यांची मर्यादा आहे, ती हटवतील."
प्रियांका पुढे म्हणाल्या, "ते व्यासपीठावर उभे राहून सांगतात की माझा भाऊ आरक्षणाच्या विरोधात आहे. तो व्यक्ती, ज्याने मनिपूर ते मुंबईपर्यंत न्याययात्रा केली. त्या व्यक्तीविरोधात बोलतात की, ते आरक्षणाच्या विरोधात आहेत. खोटं बोलतात."
"हे लोक आपल्यासोबत भेदभावही करतात. महाराष्ट्रातून यांनी अनेक उद्योग दुसरीकडे पाठवले. एक पंतप्रधान आणि एका सरकारची दृष्टी काय असायला हवी? एक पंतप्रधान आणि सरकार आई आणि पित्यासमान असतात. त्यांनी भेदभाव करायला नको. महाराष्ट्रातून उद्योग हटवले, दुसऱ्या राज्यांत पाठवले," असा आरोपही यावेळी प्रियांका गांधी यांनी केला.