संदीप प्रधान, मुंबईनक्षलवाद्यांबाबत माहिती देणा-या व्यक्तीस देण्यात येणा-या बक्षिसाच्या रकमेत आॅगस्ट २०१४ मध्ये घसघशीत वाढ करण्यात आली. परंतु खब-याने सांगितलेला नक्षलवादी ‘धरला’ गेला तरच बक्षीस देण्याची मेख गृह खात्याने मारल्याने आतापर्यंत एकाही खब-याला या निर्णयाचा लाभ झाला नाही. त्यामुळे आता खबऱ्याने माहिती दिलेला नक्षलवादी चकमकीत ‘मारला’ गेला तरीही बक्षिसाची रक्कम खबऱ्याला मिळणार आहे. अखेर गृहखात्याने ‘ध’चा ‘मा’ केल्याने किमान २० खबऱ्यांचा बक्षिसाचा रोखलेला मार्ग मोकळा झाला आहे.महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ व भंडारा या जिल्ह्यातील नक्षलवाद्यांविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तींना रोख बक्षिसे देण्याची योजना २४ नोव्हेंबर २००६ रोजी अमलात आली. आंध्र प्रदेश सरकारने नक्षलवाद्याची माहिती खबऱ्याने दिल्यानुसार त्याला अटक झाली किंवा चकमकीत हत्या झाली तर बक्षिस देण्याची योजना सुरु केली होती. त्याच धर्तीवर ही योजना सुरु झाली. ८ आॅगस्ट २०१४ रोजी गृह खात्याने आदेश काढून रक्कमेत घसघशीत वाढ केली.गृह खात्याच्या मखलाशीमुळे २०१३ व २०१४ या वर्षात ज्या खबऱ्यांच्या सूचनेवरून किमान ३५ नक्षलवादी मारले गेले त्यापैकी एकाही खबऱ्याला बक्षिस मिळू शकले नाही. असे किमान २० खबरे बक्षिसाच्या प्रतिक्षेत होते. याबाबत पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, नक्षलवाद्यांबाबत खबर कुणी दिली ते लपून राहत नसल्याने खबऱ्यांना घरदार सोडून जावे लागते. अशावेळी त्यांना चरितार्थाकरिता दुसरा मार्ग मिळावा हा बक्षिसाची रक्कम वाढवण्यामागे हेतू होता. नव्या आदेशांमुळे तो साध्य होईल. तसेच पूर्वलक्षी प्रभावाने आदेश लागू होत असल्याने गेल्या दोन वर्षातील कारवायांना सहाय्य केलेल्या खबऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
‘ध’चा ‘मा’ केल्याने खबऱ्यांचे बक्षीस पक्के
By admin | Published: February 16, 2015 3:11 AM