लोकमत न्यूज नेटवर्कबिबवेवाडी : सुमारे ५०० हून अधिक पीएमपीच्या फेऱ्या असलेला अपर डेपो म्हणजे समस्यांचे माहेरघर बनला आहे. या डेपोमध्ये फक्त प्रवाशांनाच नाही, तर येथील कर्मचाऱ्यांनादेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या डेपोमध्ये जातानाच पीएमपी चालकांना रस्त्यावरील अतिक्रमणांचा सामना करावा लागतो. राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमण विभाग या ठिकाणी कधीच कारवाई करीत नाही, हे सत्य येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून सहन करीत आहेत. या डेपोमध्ये रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. डांबरीकरणदेखील केलेले नाही. त्यामुळे कायम चिखलातून वाट काढत प्रवाशांना व पीएमपी कर्मचाऱ्यांनादेखील दिवस काढावा लागतो. या डेपोमधील सर्वांत मोठी समस्या म्हणजे, या डेपोच्या जागेत खासगी वाहनचालकांनी पार्किंग सुरू केल्यामुळे बस या थांब्यापासून सुमारे ४०० मीटर दूर लावाव्या लागतात. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या मुख्य थांब्यावर बसण्यासाठी बाकडेच नाहीत. बस थांब्यात बसणे म्हणजे साक्षात रोगाला आमंत्रण देणे इतकी दुरवस्था येथील बसथांब्याची झालेली आहे. एका कोपऱ्याला स्वच्छतागृह आहे, नागरिकांना ते दिसतदेखील नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, प्रवाशांना सूचना देण्यासाठी माईक नाही, बसचे वेळापत्रकही नाही, अशा एक ना अनेक समस्या या डेपोपध्ये पाहायला मिळत आहेत.येथील अनधिकृत उभ्या केलेल्या गाड्यांवर सहकारनगर वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, ती केली जात नाही. या डेपोमध्ये नागरिकांना व कर्मचाऱ्यांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सुमारे ६५ शेड्यूलमध्ये १६ मार्गांवर या डेपोमधून गाड्या जातात. अनेक मार्गांवरील गाड्या बंद केल्या आहेत. मात्र, याची माहिती आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला देता येणार नाही, असे येथील पीएमपी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पीएमपीचे उपायुक्त तुकाराम मुंढे यांनी मागील दोन महिन्यांत केलेल्या अनेक सुधारणांमुळे पीएमपी बदलू लागली आहे. मात्र, बाकीच्या सुविधा करण्यासाठी इतर विभागाची साथ त्यांना मिळाली तर प्रवाशांची संख्या वाढेल. ४सार्वजनिक वाहतूक वाढल्यामुळे पुणे शहराला वाहतूककोंडीच्या अभिशापातून मुक्त करता येईल. प्रदूषणावरही काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. मात्र, इतर विभागातील अधिकारी त्यांना साथ देतील का, असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा आहे.येथून कात्रजला जाण्यासाठी बस सुरू करावी. ही बस नसल्यामुळे तीन किमी जाण्यासाठी आम्हाला १० किमी उलटे फिरून जावे लागते.- गणपत कासवा, प्रवासीपीएमपी बसची दुरवस्था झाली असून, खिडक्या तुटल्या आहेत, अनेकजण गुटखा खाऊन थुंकलेले असतात. त्यामुळे स्वच्छता करावी. - श्रीराज दुगड, प्रवासी
समस्यांच्या विळख्यात अडकला पीएमपी डेपो
By admin | Published: June 05, 2017 1:36 AM