ठाणे : तब्बल अडीच हजार कोटींच्या २३ टन इफेड्रिन या अमली पदार्थाच्या साठ्याप्रकरणी अटकेत असलेला पुनीत श्रींगी, शिपिंग कंपनीचा व्यवस्थापक हरदीप गील, सोलापूरच्या ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लि.’ या कंपनीचा संचालक मनोज जैन यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे. पण त्यांच्याकडून फारशी माहिती उपलब्ध होत नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.दिवस एव्हॉन लाईफ सायन्सेसचा सल्लागार पुनीत याच्या शोधात ठाणे पोलीस होते. त्याला अंधेरीतून २६ एप्रिलला अटक करण्यात आली. त्याच्याकडे कंपनीची स्वीफ्ट डिझायर कार मिळाली. याच कारमध्ये चार कोटींचे १० किलो इफेड्रिनही जप्त करण्यात आले. त्याच्याच चौकशीत एका शिपिंग कंपनीचा व्यवस्थापक हरदीप गील याला नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पुनितच्या मुंबई आणि विरारच्या तसेच मनोज जैनच्या मुंबईतील आणि हरदीपच्या नवी मुंबईतील घरांचीही पोलिसांनी झडती घेतली. या झडतीत पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही. पुनीतकडून हरदीपने परदेशात पाठविण्याचा अमली पदार्थांचा १८० किलोचा घेतलेला साठा समुद्रात फेकल्याची माहिती दिली. त्याचीही पक्की माहिती अद्याप न मिळाल्याने त्याबाबतचे गूढ कायम आहे. या व्यतिरिक्त किशोर राठोड आणि जयमुखी यांच्याबाबतची कोणतीही माहिती पुनीत किंवा जैन यांच्याकडून मिळालेली नाही. तसेच विकी गोस्वामी याचाही नेमकी ठावठिकाणा पोलिसांना मिळालेला नाही. एव्हॉनचे अन्य दोन संचालक राजेश कैमल आणि अजित कामत यांचीही चौकशी सुरुच आहे. पोलिसांची वेगवेगळी ११ पथके गुजरात, सोलापूर, गोवा, हैदराबाद आणि दिल्ली या ठिकाणी तपास करीत आहेत. परंतु अटक केलेल्या आरोपींकडून चौकशीत फारशी माहिती पुढे आलेली नाही. तिघेही चौकशीत फारसे सहकार्य करीत नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जैन यांच्या राजीनाम्यामुळे कारभार बंदएकीकडे ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लि.’ ही कंपनी बंद का करण्यात येऊ नये, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासन विभागाने कंपनीला पाठवली आहे. दुसरीकडे कंपनीचे मुख्य संचालक मनोज जैन यांनी राजीनामा दिला. उर्वरित दोन संचालकांची ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. कंपनीच्या अनेक विभागांना पोलिसांचे सील लागले आहे. कामगारांचीही चौकशी सुरु आहे. त्यामुळे या कंपनीचा कारभार आता पूर्णपणे बंद पडला आहे. जयमुखीवर टार्गेटठाणे पोलिसांनी इफे ड्रिनचे देशभर वितरण करणारे जयमुखी आणि किशोर राठोड या दोघांना पकडण्यासाठी चार स्वतंत्र पथके तयार केली आहेत.विकी गोस्वामीप्रमाणेच या दोघांना आधी अटक करण्याचे टार्गेट ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
आरोपींची ‘बोलती’ बंद झाल्याने तपासात अडचणी
By admin | Published: May 02, 2016 12:52 AM