मुंबई : शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करण्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलने केला आहे. राष्ट्रीय व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात तावडे यांनी केलेल्या घोषणेला तीन महिने उलटले असून, कार्यवाही तर दूरच; मात्र शिक्षकांची वैद्यकीय देयके मंजुरीमध्येही अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी केला आहे. शासनाने १८ सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयात वैद्यकीय देयके मंजुरी अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना दिल्याचे सुळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, शहरात जिल्हा परिषद नसल्याने येथील वैद्यकीय देयकांना मंजुरी देण्यासाठी सीईओ नाहीत. परिणामी, येथील शिक्षक व शिक्षकेतरांची वैद्यकीय देयके मंजूर होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मंजुरी देण्याचा अधिकार कोणाकडेच नसल्याने अनेक प्रस्ताव कोणाकडे सादर करावेत, याबाबत शाळा प्रशासनातही संभ्रमाचे वातावरण आहे. ५ सप्टेंबर रोजी तावडे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने शिक्षकवर्ग नाराज आहे. (प्रतिनिधी)
वैद्यकीय देयके मंजुरीत शिक्षकांना अडचणी
By admin | Published: December 07, 2015 1:50 AM