मुंबई : हिट अॅण्ड रनचा अपघात झाला, त्या वेळी अभिनेता सलमान खानने मद्यपान केले होते व मी त्याला गाडी हळू चालव असे वारंवार सांगत होतो़ पण सलमानने ऐकले नाही, ही दिवंगत पोलीस हवालदार रवींद्र पाटीलची साक्ष या खटल्यात ग्राह्य धरावी, अशी मागणी करणारा अर्ज सरकारी पक्षाने सोमवारी सत्र न्यायालयात केला़सत्र न्यायाधीश डी़डब्ल्यू़ देशपांडे यांनी बचाव पक्षाला या अर्जाचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश देऊन ही सुनावणी येत्या शुक्रवारपर्यंत तहकूब केली़ पाटील हा सलमानचा सुरक्षारक्षक होता़ घटना झाली, तेव्हा पाटील सलमानसोबत गाडीतच होता़ तसेच तो या खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार होता़ वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात पाटीलची साक्षही झाली़ त्यात त्याने वरील साक्ष दिली होती़ त्यानंतर पाटीलचे निधन झाले़ मात्र, त्या वेळी सलमानविरोधात केवळ निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा खटला सुरू होता़ आता सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे़ हा खटला नव्याने सुरू झाल्याने यामध्ये पाटीलची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरावी, यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हा अर्ज केला आहे़ पाटीलची साक्ष ग्राह्य धरल्यास सलमानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे़वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले़ यात एकाचा बळी गेला़ या प्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे़ यात दोषी आढळल्यास सलमानला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते़ (प्रतिनिधी)
सलमानसमोरील अडचणी वाढल्या
By admin | Published: February 24, 2015 4:28 AM