नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस शुक्रवार (दि.२७) पासून सुरुवात झाली असली आणि सुटीच्याही दिवशी अर्ज स्वीकृती सुरू ठेवण्यात आली असली तरी चौथा शनिवार (दि.२८) आणि रविवार (दि.२९) साप्ताहिक सुटीमुळे शासकीय कामकाज बंद असल्याने शपथपत्रांसह आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणित करून घेण्यात उमेदवारांना अडचणी आल्या. त्यामुळे शनिवारी केवळ तीनच अर्ज दाखल होऊ शकले, तर रविवारीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिका निवडणुकीसाठी ३ फेबु्रवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार आहेत. शुक्रवार, दि. २७ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत चौथा शनिवार आणि रविवार हे दोन शासकीय सुटीचे दिवस आले. मात्र, या दोन्हीही दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, चौथ्या शनिवारी (दि.२८) निवडणूक कार्यालये खुली होती. परंतु, पूर्व विभागातून दोन आणि पंचवटी विभागातून केवळ एकमेव अर्ज दाखल होऊ शकला. राज्य निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच महापालिका निवडणुकीसाठी संगणकाद्वारे आॅनलाइन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. सदर आॅनलाइन अर्ज २४ तासांत कधीही भरता येईल मात्र, संबंधित उमेदवारांना आॅनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून आवश्यक ती कागदपत्रे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांमार्फत अथवा नोटरीद्वारे प्रमाणित करून ती प्रत निवडणूक अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावी लागणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडून रीतसर अनामत रक्कम भरल्याची पावती प्राप्त झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, चौथा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुटी यामुळे शासकीय कामकाज बंद असल्याने अधिकारी वर्गही सुटीवर आहे. त्यामुळे, आवश्यक त्या कागदपत्रांचे प्रमाणिकरण करून घेण्यात उमेदवारांना अडचणी उद्भवत आहेत. परिणामी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास विलंब लागत आहे.
सुट्यांमुळे उमेदवारांची पंचाईतप्रमाणिकरणात अडचण : नामनिर्देशनपत्रास विलंब
By admin | Published: January 28, 2017 8:52 PM