नवी मुंबई : रस्त्यालगत अथवा मोकळ्या जागेवरील उभ्या बेवारस वाहनांमुळे समस्या वाढू लागल्या आहेत. ही वाहने एखाद्या गुन्ह्यात वापरल्यानंतर लपवण्याच्या उद्देशाने उभी केलेली असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे वर्षानुवर्षे रस्त्यालगत पडून असणाऱ्या बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.शहरात विविध ठिकाणी रस्त्यालगत बेवारस स्थितीमध्ये पडून असलेल्या वाहनांची शोधमोहीम पोलिसांतर्फे सुरू झाली आहे. याकरिता गुन्हे शाखेअंतर्गत विशेष पथक देखील कार्यरत करण्यात आले आहे. चोरीला गेलेल्या वाहनांचा शोध घेण्यासह बेवारस पडून असलेली वाहने शोधून त्यांच्या मालकांपर्यंत पोचण्याचे काम हे पथक करणार आहे. त्याद्वारे अनेक बेवारस वाहनांचा उलगडा होऊन त्यांची विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. पोलिसांच्या या उपक्रमातून गुन्ह्यासाठी वापरलेली मात्र बेवारस पडून असलेल्या वाहनांचा देखील उलगडा होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीला शहरात अनेक ठिकाणी अशी बेवारस वाहने उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यालगत, पदपथावर तसेच मोकळ्या मैदानात ही वाहने मोठ्या संख्येन उभी आहेत. त्यापैकी बहुतांश वाहने वर्षानुवर्षे एकाच जागी पडून असतानाही ती हटवण्याचा प्रयत्न झालेला नाही, तर काही अपघातग्रस्त वाहने घटनास्थळीच पडून राहिल्याने त्यांचे टायर अथवा उपयुक्त पार्ट नाहीसे झालेले आहेत.अनेकदा वाहन हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तक्रार देऊन विमा कंपनीकडून नफ्याची रक्कम लाटण्याच्या उद्देशाने देखील वाहने बेवारस स्थितीत अज्ञात स्थळी उभी केली जाण्याची शक्यता असते. अशी वाहने थोडीफार सुस्थितीत असतानाही त्याची ओळख पटू नये, याकरिता नंबर प्लेट काढलेली असते. परंतु गुन्हे शाखेचे विशेष पथक अशा वाहनांच्या चेसिज्वरून आरटीओकडून वाहनमालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतरही मालकाचा शोध न लागलेल्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पोलिसांकडून पार पाडली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर पडून असलेली तसेच जप्तीनंतर पोलीस ठाण्याभोवती भंगार बनून पडलेली वाहने लवकरच हटणार आहेत. (प्रतिनिधी)
बेवारस वाहने बनली समस्या
By admin | Published: June 13, 2016 3:05 AM