मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर समस्या सुटतील; काँग्रेस प्रचंड आशावादी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:22 AM2020-06-17T04:22:35+5:302020-06-17T06:53:14+5:30
सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेतले जात नाही, अशी काँग्रेसची तक्रार आहे
मुंबई : काँग्रेस नेत्यांना जनतेच्या हिताचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे. ती भेट झाल्यानंतर सर्व समस्या सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त करताना खा. संजय राऊत यांनी अर्धवट माहितीवरून आमच्यावर अग्रलेखातून टीका करणे योग्य नाही, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लागवला.
सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेतले जात नाही, अशी काँग्रेसची तक्रार आहे. तसेच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील जागा वाढवून मिळाव्यात अशीही मागणी आहे. या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर ‘सामना’मधून टीका करण्यात आली आहे. ‘खाट का कुरकुर करते?’ असे म्हटले आहे. यावर थोरात म्हणाले, जर शांत झोपायचे असेल तर कुरकुरणारी खाट नीट करावी लागते. त्यासाठी चावडीवर जाऊन भांडण केले पाहिजे असे नसते. राज्याच्या विकासाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या सासऱ्याचे निधन झाल्याने आमची भेट लांबणीवर पडली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.