आॅनलाइन लोकमतठाणे, दि. 2 - संपूर्ण राज्यभरातील पेट्रोलपंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई अद्यापही सुरूच असून शनिवारी आणि रविवारी नागपूर तसेच अमरावती भागांतील कारवाईने हा आकडा आता ६८ वर पोहोचला आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी चौघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूरच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) जरीपटका या विनोद आरमेरकर यांच्या पंपावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तपासणी केली. यात पाच लीटरच्या मापात तब्बल ३०० मिली पेट्रोल कमी मिळाले. या ठिकाणाहून दोन पल्सर मशीन आणि दोन मदरबोर्ड जप्त करण्यात आले. धुळ्यात पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने देवभाणे येथील एचपीसीएलच्या ‘एसएसपीएस सेठी ब्रदर्स’ या राजू सेठी यांच्या पंपावर तपासणी केली. यात मात्र कोणताही गैरप्रकार आढळला नाही. अमरावती येथेही निरीक्षक ठाकरे यांच्या पथकाने मोर्शी तालुक्यातील लेहगावातील कीर्ती जाधव यांच्या एचपीसीएल कंपनीच्या ‘पद्मिनी पेट्रोलपंपावरही कारवाई केली. यातही पाच लीटरमागे १०० मिली पेट्रोल कमी आढळले. या ठिकाणाहूनही पल्सर मशीन आणि दोन कंट्रोल कार्ड जप्त करण्यात आले. या तीनपैकी दोन पंपांवर गैरप्रकार आढळल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई झाली, तर चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक विकास घोडके यांचे पथक यवतमाळमध्ये, यशवंत चव्हाण यांचे चंद्रपूरमध्ये, तर धुळ्यातील पंपांची तपासणी जॉन यांच्या पथकांमार्फत करण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी ‘लोकमत’ला दिली.
पेट्रोल पंपावरील कारवाईचा सिलसिला सुरूच, चौघांना अटक
By admin | Published: July 02, 2017 10:30 PM