राजगुरुनगर : आमदार आदर्श गाव योजनेतील खेड तालुक्यातील चारही गावांचा विकास आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळेल, अशी माहिती तहसीलदार सुनील जोशी यांनी दिली. या गावांतील १०० टक्के लोकांना आधारकार्ड आणि रेशनकार्ड देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. खेड तालुक्यात आमदार सुरेश गोरे यांनी धामणे, आमदार प्रकाश कातर्पेकर यांनी तळवडे, आमदार मंगेश कुडाळकर यांनी वांद्रे आणि आमदार गौतम चाबुकस्वार यांनी साकुर्डी ही चार गावे आमदार आदर्श गाव योजनेत घेतली आहेत. या योजनेत दत्तक गावांतील ग्रामस्थ सुचवतील ती सर्व विकासकामे २ वर्षांत पूर्ण करावयाची आहेत. गावात ग्रामसभा घेऊन ही कामे ठरवायची असतात. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात येतात. शासनाच्या सर्व योजनांचे निधी या गावांमध्ये प्राधान्याने देण्यात येणार आहेत. या गावांचे प्रत्येकी दोन ते साडेतीन कोटींचे अंदाजपत्रक तयार झाले आहे. त्यातून रस्ता, साकव, स्वच्छतागृह, शाळाखोल्या, पाणी योजना इत्यादी कामे या गावांमध्ये करण्यात येणार आहेत, असे जोशी यांनी सांगितले. या गावांमध्ये शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून, एकही लाभार्थी प्रलंबित नाही, असे ते म्हणाले. जुनी झालेली रेशनकार्डे आणि ज्यांच्याकडे रेशनकार्डे व आधारकार्डे नाहीत त्यांना या गावातच कार्डे देण्यात येणार आहेत. (वार्ताहर)>या आदर्श गावांमध्ये भौतिक विकासाबरोबर कौशल्य विकास, मानवी संसाधन, शिक्षण, जनजागृती, वृक्षतोड, दारूबंदी, महिला व बालविकास या विषयांबाबतही उपक्रम करणे अपेक्षित आहे, असेही जोशी यांनी सांगितले.
आमदार आदर्श गावांचा आराखडा मंजुरी प्रक्रियेत
By admin | Published: June 10, 2016 1:41 AM