पुणे : संपूर्ण देश अचानक लॉकडाऊन केल्याने देशभरातील मोठ्या शहरांमध्ये लाखो कामगार व अन्य नागरिक अडकून पडले़ लॉकडाऊनला ५० दिवस झाल्यानंतर राज्यांनी एकमेकांशी ठरवून या कामगारांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. केवळ पुणे शहरातून आतापर्यंत तब्बल ३२ रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश, बिहारला रवाना झाल्या आहेत. एका रेल्वेगाडीतून जवळपास १४०० प्रवासी जात असतात. पुणे विभागांचे रेल्वे व्यवस्थापक यांना प्रवाशांची यादी दिल्यानंतर ती मंजूर केली जाते व प्रवासी त्या गाडीत बसून आपल्या गावाला रवाना होतात. मात्र, हे करताना अगोदर एक मोठी प्रक्रिया करावी लागते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या श्रमिक रेल्वेमुळे ट्विटर युद्ध सुरु आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक रेल्वेगाडी सोडण्यासाठी किती मोठा व्याप करावा लागतो, याची कल्पना अनेकांना नसते.पुणे शहराचे समन्वयक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी ही सर्व प्रक्रिया किती किचकट आणि प्रचंड मनुष्यबळाची गरज असलेली कशी आहे हे नेमक्या शब्दात सांगितले. गेल्या १५ दिवसांपासून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात परप्रांतियांना त्यांच्या गावी जाण्यासाठी यादी करण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीने पोलीस ठाण्यात येण्याऐवजी त्यांनी १५ ते २० जणांचा ग्रुप करुन त्या गटप्रमुखामार्फत सर्वांनी फार्म भरुन घेतले जातात.त्यानंतर त्यांची राज्य व जिल्ह्यानुसार वर्गवारी करुन ते पोलीस उपायुक्तांकडे पाठविले जातात. शहरातील सर्व उपायुक्तांकडे आलेल्या प्रवाशांची यादी एकत्रित केली जाते. त्यानुसार एका राज्यातील विशिष्टभागात जाणारे १४०० प्रवाशांची संख्या झाल्यावर त्यांनी एक स्वतंत्र यादी बनविली जाते. ही यादी संबंधित राज्याच्या नोडल अधिकार्यांना पाठविले जाते व त्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात परत येण्याची परवानगी मागितली जाते. त्याच बरोबर ही प्रवाशांची एक यादी स्थानिक रेल्वे अधिकार्यांना पाठवून त्यांच्याकडे रेल्वेची मागणी केली जाते. संबंधित राज्याने परवानगी दिल्यानंतर रेल्वेला काही वेळा प्रवासी तारीख कळविले जाते. त्यानंतर रेल्वेकडून विशेष गाडी मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी त्यासाठी लागणारे आवश्यक निधी रेल्वेकडे जमा करतात. त्यानंतर रेल्वे त्यांचे तिकीट इश्यू करण्यास परवानगी देते. हे सर्व झाल्यावर पोलिसांकडून प्रत्येक प्रवाशांना टोकन दिले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष रेल्वेगाडी कधी सुटणार याची माहिती आधल्या दिवशी कळविले जाते. त्यामुळे या सर्व १४०० प्रवाशांना रेल्वे स्टेशनलाआणण्यासाठी शहरात काही ठिकाणे निश्चित केले जातात. तेथे गाडी सुटण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोलविण्यात येते. पीएमपीच्या साधारण ७० बस गाड्यामधून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घेऊन रेल्वे स्टेशनला येतात. रेल्वे स्टेशनवर रेल्वे कर्मचार्यांच्या मदतीने सर्वांकडून टोकन घेऊन त्यांना तिकीट देतात. त्यानंतर सर्व प्रवासीत्यांच्या गावाला रवाना होतात. त्यानंतर पुन्हा गाडी पुण्यातून रवाना झाली असून त्यातून या जिल्ह्यातील इतके प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती संबंधित राज्याच्या नोडल अधिकार्याला दिली जाते.
पुणे शहरातून जाणार्या प्रत्येक परप्रांतीय प्रवाशांना २ पाण्याच्या बाटल्या, फुड पॅकेट, गुळची ढेप, एक बाटली दुध दिले जाते. सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळून हे सर्व करण्यात पोलिसांचे मोठे मनुष्यबळ त्याकामी लावावे लागते.रेल्वेच्या स्थानिक अधिकार्यांना सर्व प्रथम यादी दिल्याशिवाय विशेष श्रमिक एक्सप्रेसचे प्रक्रियाच सुरु होऊ शकत नाही. ही मोठी प्रक्रियअसते. यादी दिल्यानंतर रेल्वेला त्या मार्गावरील सर्व विभागांना त्याचीमाहिती द्यावी लागते व त्यानंतर तिचा मार्ग, त्यावेळची मार्गावरील उपलब्धतता ठरवून मग गाडीची तारीख, वेळ निश्चित केली जाते. त्यामुळे अनेकदा रेल्वे आदल्या दिवशी गाडी कधी सुटणार हे सांगते.