- तानाजी पोवार। लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘अॅगड्रॉईड-अॅप’ विकसीत केले आहे. याद्वारे हवामान, पाणी, माती आणि पावसाचे प्रमाण याचा विचार करून पुढील सहा महिन्यांत कोणते पीक घेता येईल, हे शेतकऱ्यांना ठरविणे सोपे जाणार आहे. या अॅपमुळे शेतकऱ्याला आपल्या परिसरातील लागवड केलेल्या विविध पिकांची माहिती मिळेल. याशिवाय मातीची गरज, लागवडीची प्रक्रिया, रोग व कीड, खते आणि कीटकनाशके याविषयीची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे पिकांचे नियोजन करणे सोपे होणार आहे. शेतमाल विक्रीसाठी कोणत्या बाजारपेठेत नेला म्हणजे त्याला चांगला दर मिळेल, याची माहितीही अॅपवरील नकाशाच्या मदतीने मिळणार आहे. सरकारी योजनांचीही अद्ययावत माहितीही मिळेल. ‘अॅगड्रॉईड-अॅप’साठी या विद्यार्थ्यांचे योगदान
शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विवेक कुरूवडे (रा. खांबित, ता. आस्ती, जि. वर्धा), कोमल हाबीवंत (रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), श्रद्धा निंबाळकर (सातारा), शीतल कुलकर्णी (रा. हिंगणगड, ता. खानापूर, जि. सांगली), शहदमनी मोमीन (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी विशेष परिश्रम घेतले.शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन हे ‘अॅगड्रॉईड-अॅप’ विकसीत केले आहे. येत्या पंधरा दिवसांत ‘गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. - प्रसन्न करमरकर, सहायक प्राध्यापक, संगणक शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर