पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून नॅनो-बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेले डॉ. विजय कनुरू यांनी नॅनोटेक्नोलॉजीचा वापर करून हळदीवर संशोधन केले आहे. एरवी पाण्यात अजिबात न विरघळणाऱ्या हळदीला डॉ. कनुरू यांनी आपल्या संशोधनाद्वारे हळद रसाचे स्वरूप दिले आहे. हा रस पाण्यात विरघळण्याजोगा असून त्यातून कर्क्युमिन हे औषधी द्रव्य पुरेशा प्रमाणात मिळते. त्यामुळे दररोज सकाळी केवळ १ ते २ चमचे हळद रसाचे सेवन केल्यास दैनंदिन प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे अनेक विपरित परिणाम टाळणे सहज शक्य असल्याचे डॉ. कनुरू यांनी सांगितले. या हळद रसाला त्यांंनी '' हरस टर्मेरिक ज्यूस'' असे नाव दिले असून डेली डीटॉक्सचे फायदे मिळवण्यासाठी त्याचे सेवन उपयुक्त ठरते, असे डॉ. कनुरू यांनी सांगितले. ते म्हणाले, शहरातील वाहनांची गर्दी, उद्योगांमुळे होणारे प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर होणारी बांधकामे यामुळे हवेत प्रदूषणाचे प्रमाण मोठे असते. प्रवास वा कामाच्या निमित्ताने बराच वेळ प्रदूषित हवेत राहावे लागल्यानंतर शारीरिक व मानसिक थकवा आणि तणाव जाणवतो. पीएम २.५ अर्थात अतिसूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांवाटे रक्तात मिसळत असल्यामुळे ते अधिक त्रासदायक ठरतात. अशा प्रदूषणाच्या त्रासामुळे शरीरात ठिकठिकाणी सूज येऊ शकते, तसेच ह्रदयाच्या रक्तवाहिन्या, यकृत आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होतात. पुण्यात या प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण मोठे असून नॅनो टेक्नोलॉजीद्वारे तयार केलेला हळदीचा रस प्रदूषणाच्या दुष्परिणामांसाठी प्रतिबंधक ठरू शकतो. या रसामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता साधली जाते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि त्वचा निरोगी होण्यासाठीही याची मोठी मदत होते, असे ते म्हणाले. आपल्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश असला तरी त्यातून आपल्याला मिळणा-या कर्क्युमिन या औषधी द्रव्याची मात्रा फारच कमी असते. शिवाय जे औषधी गुण त्यातून मिळतात ते शरीरात पूर्णत: शोषले जात नाहीत, असेही डॉ. कनुरू यांनी सांगितले. हळद रसाच्या निर्मितीत नॅनोटेक्नोलॉजीचा वापर झाल्यामुळे त्यात कर्क्युमिन द्रव्याचे प्रमाण चांगले राखता आले, शिवाय ते पेशींमध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते, असे ते म्हणाले.
.........एक किलो हळद एका चमच्यातनॅनो टेक्नॉलॉजीमुळे एक किलो हळदीत असणारे कर्क्युमिन एका चमच्यात आणण्यात यश मिळाले आहे. एरवी एखादा माणूस दिवसाला एक किलो हळद खाऊ शकत नाही. परंतु, एक चमचा हळद रस सहज घेऊ शकतो. शिवाय या रसामध्ये हळदीचा कडवट, उग्रपणाही नसतो. नुसती हळद खाल्ली तर ती पचण्यास जड असते. हळद रसामुळे हळदीचे सर्व पोषक गुणधर्म शरीरात सहजपणे शोषले जातात. हळदीच्या अनोख्या गुणधर्मांचा फायदा मिळवून देणाऱ्या हळद रसाच्या व्यावसायिक उपयोगासाठी इंग्लंडमधल्या किंग्ज कॉलेज, केंब्रिज युनिव्हर्सिटीने रस दाखवला आहे. या शोधाचे ग्लोबल पेटंट मिळवण्याची प्रक्रियाही मी चालू केली आहे.-डॉ. विजय कनुरु