- नीलेश शहाकार/ ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 23 - रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येत आहे.त्यामुळे जमिनीचा नैसर्गिक पोत कायम ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर बुलडाणा येथील कृषी विभागाच्या जैविक कीड नियंत्रक प्रयोगशाळेत यावर्षी प्रथमच जैविक द्रवरुप खत निर्मिती होत आहे. रब्बीपुर्व बुलडाणा जिल्ह्याने ५ हजार लिटरचे जैविक खत निर्मितीचे उद्दीष्ट ठेवले आहे.
या किड नियंत्रक प्रयोगशाळेत रायझोबियम, अझोटोबॅक्टर व पि.एस.बी ही जैविक खते किंवा जिवाणू संवर्धने खरीपासाठी तयार करण्याचे निश्चित झाले. तर यंदा रब्बीसाठी यात केएनबी व एनपीके (नत्र, स्फु रद, पलाश) वाढविणारे दोन संवर्धने तयार करण्याचे ठरविण्यात आले. सद्या जिल्हा कृषी विभाग जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या तयारीत असून प्रयोगशाळेत तयार होणारी ही औषध शेतक-यांना फायदेशिर ठरणार आहे.
किड व पिकांनामर रोगामुळे गत चार वर्षात शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर जैविक खताचा वापर प्रभावी उपाय असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने जैविक खत निर्मिती करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले. राज्यातील कृषी विभागाच्या अख्यारित्या असलेल्या जैविक किड नियंत्रक प्रयोगशाळेत जैविक खत निर्मितीचे ठरविण्यात आले.
जिल्ह्यातील २० हजार शेतक-यांना लाभ
जैविक खत निर्मिती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कृषी विभागाने आवाहन केले होते. रायझोबियम हे जिवाणू संवर्धन सोयाबिन, उडीद, मूग, तूर, चवळी, अझोटोबॅक्ट हे जिवाणू संवर्धन कापूस, ज्वारी, मका, बाजारी व पि.एस.बी हे सर्व पिकांसाठी उपयुक्त असून उत्पन्नात १५ टक्के वाढ करण्यास सक्षम आहे.यामुळे जिल्ह्यातील २० हजार शेतक-यांनी जैविक खताचा लाभ घेतला आहे.