जिल्ह्याबाहेरही मागणी : गोंदिया जिल्ह्यात १९00 तलावांत होते उत्पन्नदेवानंद शहारे - गोंदियाजिल्ह्यात मागील एक वर्षात शासकीय नोंदीनुसार नऊ हजार मेट्रिक टन मासोळ्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. वास्तविक मासोळ्यांच्या उत्पादनाचा आकडा यापेक्षाही जास्त असून येथील मासोळ्या अगदी पश्चिम बंगालपर्यंत पाठविल्या जात आहे. शासकीय नोंदीनुसार उत्पादन झालेल्या नऊ हजार मेट्रिक टन मासोळ्यांच्या विक्रीतून जिल्ह्यात सहा कोटी रूपयांचा लाभ मासेमार्यांना झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या ६५ तलावांत मासोळ्यांचे उत्पादन घेतले जाते. १0 हजार ९४४ हेक्टर जलक्षेत्राचा मासोळ्या उत्पादनासाठी उपयोग केला जात आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या १३७0 तलावांतही मासोळ्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी ५८२२ हेक्टरचे जलक्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यात १३४ मत्स्य पालन सहकारी संस्था कार्यरत आहेत. यात गोंदिया तालुक्यात १९, तिरोडा तालुक्यात १३, सालेकसा तालुक्यात ८, सडक/अर्जुनी तालुक्यात २२, अर्जुनी/मोरगाव तालुक्यात २७, आमगावात १२, गोरेगावात १८ व देवरी तालुक्यात १४ मत्स्यपालन सहकारी संस्था आहेत. या संस्थांमधील ९१५0 सदस्य मत्स्यपालन व्यवसायात जुळलेले आहेत. गोंदिया जिल्हा मत्स्यपालन सहकारी संघ सदर सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवते. जिल्ह्यात मत्स्य पालनासाठी सहा कोटी मत्स्य बियांची आवश्यकता आहे. इटियाडोह व अंभोरा येथे शासनामार्फत मत्स्य जिर्यांची निर्मिती केली जाते. मासोळ्यांना प्रजननक्षम बनविणे, प्रजनन करणे व देखभाल करण्याचे काम तेथे केले जाते. अंभोरा येथे १.३५ कोटी मत्स्य जिर्यांची पैदास होते. अंभोरा येथे इटियाडोहवरून मत्स्य जिरे आणून टाक्यात सोडले जातात. तेथे त्यांची देखभाल केली जाते व प्रजननयोग्य बनविले जाते. इटियाडोह व अंभोरा या दोन्ही ठिकाणी १0 लाख मत्स्य बिजांची निर्मिती होती. मत्स्य बियांची निर्यातसुद्धा केली जाते. आता मत्स्य निर्मिती जिल्ह्यात स्वयंपूर्ण झाली आहे.जिल्ह्यातील नागरिक पाच कोटींच्या मासोळ्या दरवर्षी फस्त करतात. जिल्ह्यात अनेक खासगी तलाव आहेत. त्यांच्या संख्येची कसलीही नोंदणी मत्स्य सहसंचालकांच्या कार्यालयात उपलब्ध नाही.
नऊ हजार मेट्रिक टन मासोळ्यांचे उत्पादन
By admin | Published: June 10, 2014 1:05 AM